
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान फक्त त्याच्या स्टारडम आणि सिनेमांसाठीच ओळखला जात नाही, तर त्याच्या विचारांसाठीही तो प्रसिद्ध आहे. पडद्यावरच्या ग्लॅमरपलीकडे जाऊन त्याने अनेकदा आपल्या शब्दांतून जगण्याचं तत्त्वज्ञान मांडलं आहे. अपयशावर मात करण्यापासून ते स्वतःची ओळख जपण्यापर्यंत, शाहरुखचे हे विचार सिनेमाच्या पलीकडे जाऊन जगभरातील लोकांच्या हृदयाला भिडतात. आज शाहरुखच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त, त्याने दिलेल्या काही महत्त्वाच्या जीवनमंत्रांवर एक नजर टाकूया.
२०१२ मध्ये येल विद्यापीठाने (Yale University) शाहरुखला 'चब फेलो' (Chubb Fellow) म्हणून सन्मानित केलं होतं. त्यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना त्याने स्वतःची ओळख जपण्यावर भर दिला. विशेषतः जेव्हा जग तुम्हाला समजून घेत नाही, तेव्हा स्वतःवरचा विश्वास ढळू न देण्याचा सल्ला त्याने दिला. शाहरुख म्हणाला होता, "टिकून राहण्यासाठी तुम्ही एकच गोष्ट करू शकता, ती म्हणजे तुम्ही आतून जे आहात तेच राहा. जग तुमच्याशी कठोर वागेल, ते तुम्हाला समजून घेणार नाही. अशा वेळी तुम्ही स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे."
२०१५ मध्ये एडिनबर्ग विद्यापीठाने (University of Edinburgh) शाहरुख खानला डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलं. हा सन्मान स्वीकारताना त्याने एक भन्नाट भाषण दिलं. स्पष्टता येण्यासाठी गोंधळून जाणं (Confusion) किती गरजेचं आहे, हे त्याने सांगितलं. "गोंधळून जाणं अगदी ठीक आहे. गोंधळातूनच जगातली सगळी स्पष्टता येते. त्याची फार काळजी करू नका. स्वतःच्या विचारांबद्दल इतकेही ठाम राहू नका की तुम्ही इतरांच्या मतांचा आदर करणंच सोडून द्याल," असं तो म्हणाला. त्याने विद्यार्थ्यांना इतरांच्या मतांचा आदर करण्याचा सल्ला दिला. "आपली मूल्यं ही आपली असतात, त्यामुळे आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरत नाही. फार तर आपण त्यांच्यापेक्षा वेगळे ठरतो," असंही त्याने नमूद केलं.
एडिनबर्ग विद्यापीठातच बोलताना शाहरुखने दयाळूपणाबद्दल एक वेगळाच दृष्टिकोन मांडला. इतरांना मदत करणं म्हणजे त्यांच्यावर उपकार करणं नाही, तर त्यातून स्वतःला मिळणारा आनंद महत्त्वाचा असतो, असं तो म्हणाला. "इतरांसाठी स्वतःला झोकून द्या. पण हे करताना लक्षात ठेवा की, दयाळू वागून तुम्ही कोणावरही उपकार करत नाही आहात. हे सगळं फक्त तुम्हाला स्वतःला आतून बरं वाटावं यासाठी असतं. शेवटी, तुम्ही केलेल्या कोणत्याही मदतीचा किंवा दानाचा सर्वात जास्त फायदा तुम्हालाच होत असतो," असं शाहरुखने आपल्या भाषणात सांगितलं.
यश आणि अपयशाच्या वास्तवावर बोलताना शाहरुखने सांगितलं की, यश आनंद देतं, पण अपयश आणि त्याला आपण कसा सामोरा जातो, यातूनच आपली प्रगती होते. येल विद्यापीठात बोलताना तो म्हणाला, "यश ही खूप छान गोष्ट आहे, पण त्यातून आपण काही शिकतोच असं नाही. आपण त्याचा आनंद घेतो, कदाचित आपण त्यासाठी पात्रही असतो, पण त्यातून आपल्याला शहाणपण मिळत नाही. आणि म्हणूनच ते दुसऱ्याला देताही येत नाही. जर तुम्हाला अपयशाची पुरेशी भीती वाटत नसेल, तर तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता कमी असते. अपयश नसणं म्हणजे यश नाही. तर अपयशाला तुम्ही कसा प्रतिसाद देता, यावर तुमचं यश अवलंबून असतं."
अफाट प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवूनही, शाहरुखचा असा विश्वास आहे की कोणतंही यश किंवा पैसा मानवी नातेसंबंध आणि दयाळूपणाची जागा घेऊ शकत नाही. "तुम्ही कितीही श्रीमंत, यशस्वी आणि प्रसिद्ध झालात, तरी तुमच्या चांगुलपणामुळे लोक तुम्हाला जे प्रेम देतात, त्याला कधीही कमी लेखू नका. तुम्ही तुमच्या मित्राला त्याच्या वाढदिवसाला रोल्स रॉयस (Rolls Royce) कार नक्कीच भेट देऊ शकता, पण तुमचा वाईट दिवस असताना तुमची चिडचिड शांतपणे ऐकून घेणाऱ्या मित्राची जागा ती कार घेऊ शकत नाही," असं शाहरुखने स्पष्ट केलं.
आपल्या शब्दांतून शाहरुख खानने नेहमीच स्टारडमच्या झगमगाटापलीकडचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला आहे. खरं यश हे तुम्ही किती उंचीवर पोहोचता यावर नाही, तर तुम्ही जमिनीवर किती पाय रोवून उभे आहात, यावर मोजलं जातं, याची आठवण त्याचे विचार करून देतात. दरम्यान, शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं तर, तो लवकरच सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'किंग' (King) या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.