
अभिनेता आणि गायक वीर साहू याच्यासोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांवर पहिल्यांदाच सपना चौधरीने उघडपणे भाष्य केलं आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत ३६ वर्षीय सपना म्हणाली की, सुरुवातीला आमचं नातं खूप चांगलं होतं, पण नंतर परिस्थिती बदलली.
सहा वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या सपनाने, विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पुरुषांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पतीच्या फसवणुकीकडे लक्ष वेधले. तिला लग्नामध्ये स्वतःची ओळख गमावल्यासारखं वाटलं होतं, त्यामुळे आता तिला स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे. सध्या तरी पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.
NMF News ला दिलेल्या मुलाखतीत सपना चौधरीला विचारण्यात आलं की, घटस्फोट घेण्याची गरज का भासली? यावर ती म्हणाली, "जेव्हा गोष्टी चांगल्या होत्या, तेव्हा आम्ही एकत्र होतो... आता गोष्टी चांगल्या राहिलेल्या नाहीत, त्यामुळे आम्ही एकत्र नाही."
विवाहित असूनही पत्नीची फसवणूक करणाऱ्या पुरुषांबद्दल विचारल्यावर सपना म्हणाली, "अशा लोकांना मी एवढंच सांगेन की, जो माणूस एका जागी खाऊ शकत नाही, तो अनेक जागीही खाऊ शकत नाही."
तिच्या प्रेमाच्या संकल्पनेबद्दल विचारले असता ती म्हणाली, "माझा असा विश्वास आहे की प्रेम हे फक्त शारीरिक नाही; तर ते आत्म्याशी जोडलेले असते." प्रेमामध्ये भावनांचा समावेश असतो, पण मला वाटतं मुले जास्त व्यावहारिक असतात. आणि मुली खूप जास्त भावनिक होतात."
लग्नामुळे तिच्या ओळखीवर कसा परिणाम झाला, याबद्दलही सपनाने सांगितले. "बिग बॉसनंतर माझं लग्न झालं. त्यावेळेस मी खूप लोकप्रिय होते. मी एक उत्तम सून होते. मी एक चांगली पत्नी आणि आई होते, पण तेव्हा मला असं वाटायचं की मी फक्त कुणाची तरी पत्नी, आई किंवा वहिनी आहे," असं तिने स्पष्ट केलं.
पुढे ती म्हणाली, "त्यावेळेस मी स्वतःकडे लक्ष दिलं नाही कारण मी नात्यांमध्ये खूप गुंतले होते. पण आता मला हे समजतंय." सपनाने नातं टिकवण्याचा खूप प्रयत्न केल्याचा दावा केला, पण नंतर तिला जाणवलं की ते शक्य नाही.
तु पुन्हा लग्न करणार का, असं विचारल्यावर सपनाने उत्तर दिलं, "नाही, माझ्यासारखी मुलगी सहजासहजी प्रेमात पडत नाही. मी खूप भावनिक आहे. मी खूप मनापासून प्रेम करते."
पुढे ती म्हणाली, "भविष्यात तसा कुणी योग्य व्यक्ती भेटला तर बघू, पण सध्या तरी मी तसा काही विचार करत नाहीये. मला वाटत नाही की मी पुन्हा कधी लग्न करेन कारण माझ्या नात्यांनी मला खूप काही शिकवलं आहे. त्यामुळे, प्रेमात पडणं माझ्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं.
यावर्षी जूनमध्ये, द्वारका महिला न्यायालयाने ३५ वर्षीय सपनाला तिच्या 'Momacu' या चित्रपटाच्या प्रीमियरपूर्वी तात्पुरते संरक्षण दिले होते. न्यायालयाने तिच्या पतीला पुढील सुनावणीपर्यंत तिच्या जवळ न जाण्याचे, संपर्क न करण्याचे किंवा तिचे घर, कामाचे ठिकाण किंवा चित्रपटाच्या प्रीमियरच्या ठिकाणी न जाण्याचे आदेश दिले होते.
सपनाने पती आपल्याला वारंवार मारहाण करत असून, सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक देत असल्याचा अर्ज दाखल केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. तिने याआधी न्यायालयाला सांगितले होते की, ती आपल्या दोन लहान मुलांसह घर सोडून निघून गेली होती आणि तिने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.
या अर्जात म्हटले होते की, १० जून रोजी होणाऱ्या प्रीमियरमध्ये वीर साहू "धमक्या देऊन, हल्ला करून आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून सपनाची बदनामी करण्याचा प्रयत्न करू शकतो." या चित्रपटाच्या संदर्भात सपनाला अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे होते.
न्यायालयाने वैद्यकीय पुरावे, साहूने केलेल्या मारहाणीच्या जखमांची छायाचित्रे, आणि त्याच्या धमक्यांच्या रेकॉर्डिंग्जची दखल घेतली. त्यामुळे, पुढील सुनावणीपर्यंत पतीला "अर्जदाराशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यास" मनाई करण्यात आली आहे.
सपना चौधरी 'बिग बॉस ११' आणि 'द ५०' यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये झळकली आहे.