
Sanjay Dutt Viral Interview: संजय दत्त एक खूप चांगला पिता आहे आणि आपल्या मुलांबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह आहे. असं म्हटलं जातं की, संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला दत्तला अभिनेत्री व्हायचं होतं. पण संजय दत्त याचा कट्टर विरोधक होता. हे आम्ही नाही, तर खुद्द संजूबाबाने अनेक मुलाखतींमध्ये याचा उल्लेख केला आहे. त्रिशालाने अभिनयाला आपलं करिअर म्हणून निवडलं असतं, तर त्याने तिचे पाय तोडले असते, असंही तो म्हणाला होता. दत्तच्या काही मुलाखतींचे व्हिडीओ सध्या मीडियावर व्हायरल होत आहेत.
ही गोष्ट 2017 सालची आहे, जेव्हा संजय दत्त त्याच्या 'भूमी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. या चित्रपटात संजय दत्तने अदिती राव हैदरीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. एका मुलाखतीदरम्यान त्याने अदिती आणि त्रिशाला यांची तुलना करत म्हटलं होतं, “जर त्रिशालाने अभिनयाची निवड केली असती, तर मी तिचे पाय तोडले असते. पण अदितीसोबत मी असं करत नाहीये.”
2013 मध्येही संजय दत्तने त्रिशालाबद्दल भाष्य केलं होतं आणि मुलगी अभिनेत्री बनण्याच्या वेडाने झपाटलेली होती हे सांगितलं होतं. फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत संजूबाबा म्हणाला होता, “मला आनंद आहे की तिच्या डोक्यातून अभिनयाचं भूत उतरलं. तिने अभिनयाची महत्त्वाकांक्षा सोडून दिली आहे. ती खूप समजूतदार मुलगी आहे, जिने फॉरेन्सिक सायन्सचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे मला कधीच कळलं नाही की ती सगळं सोडून अभिनेत्री का बनू इच्छित होती. आणि या इंडस्ट्रीत अभिनेता बनण्यासाठी तुम्हाला भाषा यायला हवी. त्यामुळे तिच्यासाठी भाषा हा सर्वात मोठा अडथळा ठरला असता.”
संजय दत्त पुढे म्हणाला होता, "देवालाच माहीत असेल की तिच्या डोक्यात ही गोष्ट कुठून आली होती, पण आता नाही. मला आशा आहे की ती लवकरच FBI जॉईन करेल आणि मला अभिमान वाटेल असं काहीतरी करेल. तिच्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग व्हायला हवा." संजय दत्तने या संभाषणात त्याची मुलगी फॉरेन्सिक सायंटिस्ट आहे आणि तिने बॉलिवूडमध्ये येऊन कंबर हलवावी अशी त्याची इच्छा नाही, असं म्हणून खळबळ उडवून दिली होती.
37 वर्षीय त्रिशाला दत्त ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी दिवंगत ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. तिच्या इंस्टाग्राम बायो नुसार, ती एक फिजिओथेरपिस्ट आहे आणि न्यूयॉर्क शहरात राहते. इंस्टाग्रामवर तिचे 6.51 लाख फॉलोअर्स आहेत. ती स्वतः 1245 प्रोफाइल्सना फॉलो करते, ज्यात संजय दत्त, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.