
'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे चाहते खूप दिवसांपासून दयाबेन म्हणजेच दिशा वकानीची वाट पाहत आहेत. दिशा गेल्या सात वर्षांपासून शोमधून गायब आहे. आता दिशाचा ऑन-स्क्रीन आणि खऱ्या आयुष्यातील भाऊ मयूर वकानीने असित मोदींच्या शोमधून तिच्या अनुपस्थितीबद्दल खुलासा केला आहे. तसेच, त्याने स्पष्ट केले की दिशा तिच्या मुलांसोबत व्यस्त असल्यामुळे शोमध्ये परत येणार नाही.
मयूर वकानी म्हणाला, ‘मी तिचा प्रवास जवळून पाहिला आहे, कारण मी तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. एक गोष्ट मला जाणवली आहे की, जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणा आणि विश्वासाने काम करता, तेव्हा देवाचा आशीर्वाद मिळतो. ती खरोखरच भाग्यवान आहे, पण त्याचबरोबर तिने खूप मेहनतही केली आहे. यामुळेच लोकांनी दया म्हणून तिच्यावर इतके प्रेम केले आहे. माझ्या वडिलांनी मला नेहमीच योग्य मार्ग दाखवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आयुष्यातही आपण कलाकारच असतो. आपल्याला जी काही भूमिका मिळेल, ती आपण पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. आम्ही आजही त्यांच्या शिकवणीवर चालत आहोत. सध्या, ती खऱ्या आयुष्यात आईची भूमिका पूर्ण निष्ठेने पार पाडत आहे. मला खात्री आहे की माझ्या बहिणीच्या मनातही नेहमी हीच गोष्ट असेल.’
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दिशा वकानी दयाबेनची आयकॉनिक भूमिका साकारत होती. तथापि, ती अनेक वर्षांपासून या शोमधून गायब आहे. ती २०१८ मध्ये मॅटरनिटी लिव्हवर गेली होती आणि तेव्हापासून परत आलेली नाही. काही महिन्यांपूर्वीच, असित मोदींनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की दिशा या लोकप्रिय सिटकॉममध्ये परत येणार नाही. ही गोष्ट ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. हा शो आता एका पात्राभोवती फिरत नाही, तर गोकुळधाम सोसायटीतील अनेक रहिवाशांचे जीवन आणि आव्हाने सखोलपणे दर्शवतो.