
मुंबई- महाराष्ट्र सरकार ऐतिहासिक वस्तू राज्यात आणण्याच्या दृष्टीने महत्वाची पाऊल उचलत आहे. नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक श्रीमंत रघुजी राजे भोसले (प्रथम) यांची ऐतिहासिक तलवार लंडनमधून मुंबईत आणण्यात येणार आहे. अभिनेता संतोष जुवेकरने आभार व्यक्त करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेता संतोष जुवेकर लिहितो की, छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्याचे थोर सरदार आणि आपल्या नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी राजे भोसले यांच्या शौर्याची अभिमानाची आणि आपल्या मराठ्यांची ओळख असलेली तलवार अधिकृतरित्या लंडनहून आपल्या मातीत परत येत आहे, आपल्या महाराष्ट्रात येत आहे.
ही तलवार महाराष्ट्र सरकारने लीलावात जिंकली असून आपला ऐतिहासिक वारसा मायदेशी परत येत आहे. हा अभिमानाचा क्षण शक्य केल्याबद्दल माननीय माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री आशिष जी शेलार साहेब, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि सरकारचं मनापासून मनःपूर्वक अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार जय महाराष्ट्र जय शिवराय...
रघुजी भोसले हे 1695 ते 1755 या काळात नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक व छत्रपती शाहू महाराजांच्या काळातले मराठा सैन्याचे एक महत्त्वाचे सरदार होते. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सेनासाहिबसुभा ही पदवी प्रदान केली होती. रघुजींनी1745 ते 1755 मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्धाचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचा बंगाल ते ओडिषा पर्यंत विस्तार केला होता. त्यांनी वर्चस्व गाजवलेल्या प्रदेशांमध्ये चांदा, छत्तीसगड, संबळपूर समावेश होतो.