
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या तिच्या आगामी व्हाइब (Vibe) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, मुंबईत स्पॉट झालेल्या तिच्या एका कॅज्युअल लूकने सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रीती झिंटाच्या टी-शर्टवर ‘Team तुकाराम मुंढे’ हा मेसेज लिहिलेला दिसून आला. प्रीतीच्या या टी-शर्टमुळे सोशल मीडिया यूजर्समध्ये तुकाराम मुंढे यांच्यासह टी-शर्ट परिधान करण्यामागील कारणाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
प्रीती झिंटाला मुंबईत कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट करण्यात आले. यावेळी प्रीतीने काळ्या रंगाचा ‘Team तुकाराम मुंढे’ असा मेसेज असलेला टी-शर्ट आणि निळ्या रंगाची क्लासिक जीन्स परिधान केली होती. हातात घड्याळ आणि पायात पांढरे स्पोर्ट्स शूज असा तिचा एकूणच लूक होता. पण टी-शर्टवरील मेसेजमुळे अनेक चर्चांना उधाण आले.
प्रीतीच्या टी-शर्टवरील ‘'टीम तुकाराम मुंढे’ हे नाव तुकाराम मुंढे यांचेच आहे. तुकाराम मुंढे महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त आहेत. राज्यातील अन्नपदार्थ, औषधे आणि ब्युटी प्रोडक्ट्सच्या सुरक्षिततेशी संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि तपासणी ही एफडीएची (FDA) महत्त्वाची जबाबदारी आहे. मुंढे यांनी अलीकडच्या काळात मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर केलेल्या तपासणी आणि कारवाईमुळे चर्चेत आले आहेत.
अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाई करताना स्वच्छतेचा अभाव, किड्यांचा प्रादुर्भाव, फूड स्टोअरेज, अस्वच्छ परिसर आणि इतर नियमांचा भंग यांसारख्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. काही आस्थापनांवर परवान्याच्या निलंबनापासून ते परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रीती झिंटाने टीम तुकाराम मुंढे असा मेसेज असलेला टी-शर्ट परिधान केल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. मात्र, प्रीतीने हा टी-शर्ट नेमक्या कोणत्या कारणासाठी परिधान केला, याबाबत तिच्याकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.