Stranger Things Prequel : नेटफ्लिक्सवर २०२८ मध्ये येणार स्ट्रेंजर थिंग्जचा नवा प्रीक्वल अदर वर्ल्ड्स

Published : Nov 07, 2026, 01:43 PM IST
‘Other Worlds: A Stranger Things Adventure’ (Photo/Instagram/@strangerthingstv)

सार

नेटफ्लिक्सने 'अदर वर्ल्ड्स: अ स्ट्रेंजर थिंग्ज ॲडव्हेंचर' या नवीन स्ट्रेंजर थिंग्ज प्रीक्वल सिरीजची घोषणा केली आहे. ही सिरीज २०२८ मध्ये प्रदर्शित होईल. १९५५ मधील नेवाडात घडणाऱ्या या सिरीजमध्ये हेन्री क्रिलच्या शक्ती मिळण्यापूर्वीच्या घटना दाखवल्या जातील.

मुंबई : नेटफ्लिक्सने आपला लोकप्रिय साय-फाय शो स्ट्रेंजर थिंग्जचा आवाका वाढवत 'अदर वर्ल्ड्स: अ स्ट्रेंजर थिंग्ज ॲडव्हेंचर' या प्रीक्वल सिरीजची घोषणा केली आहे. ही सिरीज २०२८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ६ नोव्हेंबर १९८३ ला विल बायर्स बेपत्ता झाला होता. दरवर्षी या दिवशी 'स्ट्रेंजर थिंग्ज' डे साजरा केला जातो. या खास दिवशी नेटफ्लिक्सने ही मोठी घोषणा केली. या विश्वातील हा चौथा प्रोजेक्ट असेल. याआधी मुख्य सिरीज, ॲनिमेटेड शो स्ट्रेंजर थिंग्ज: टेल्स फ्रॉम ’८५ आणि रंगमंचीय प्रयोग स्ट्रेंजर थिंग्ज: फर्स्ट शॅडो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सोशल मीडियावर या प्रोजेक्टची घोषणा करताना निर्मात्यांनी लिहिलं, "हॉकिन्सच्या आधी, मॅरियन होतं. अदर वर्ल्ड्स: अ स्ट्रेंजर थिंग्ज ॲडव्हेंचर. नवीन सिरीज फक्त नेटफ्लिक्सवर, २०२८."

कथा आणि निर्मितीबद्दलची माहिती

व्हरायटीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रीक्वलची कथा १९५५ मधील मॅरियन, नेवाडा इथे घडणार आहे. हेन्री क्रिलला ज्या अलौकिक गोष्टीमुळे शक्ती मिळाली, त्याच्या आधीच्या घटना यात दाखवल्या जातील. मॅट आणि रॉस डफर या मूळ निर्मात्यांसोबत लेखिका केट ट्रेफ्री या सिरीजच्या सह-निर्मात्या आहेत. ट्रेफ्री या शो रनर आणि कार्यकारी निर्मात्या म्हणून काम पाहतील. जो राईट पहिल्या तीन भागांचं दिग्दर्शन करणार असून शॉन लेव्ही, पॉल डिक्टर, शेली मील्स, अँड्रिया स्पार्लिंग आणि पाव्हलिना हतौपिस यांच्यासोबत कार्यकारी निर्माता म्हणूनही जबाबदारी सांभाळतील. न्यू मेक्सिकोमध्ये याचं शूटिंग होणार आहे.

सिरीजमागचा क्रिएटिव्ह दृष्टिकोन

मॅट आणि रॉस डफर यांनी आपला उत्साह व्यक्त करताना सांगितलं की, "आम्ही अनेक वर्षांपासून ‘अदर वर्ल्ड्स: अ स्ट्रेंजर थिंग्ज ॲडव्हेंचर’चं स्वप्न पाहत होतो. आता ते प्रत्यक्षात येणं खूपच भारी आणि थरारक वाटतंय. आमची शो रनर केट ट्रेफ्री जी दुसऱ्या सिझनपासून आमच्या सोबत आहे आणि जिने ‘स्ट्रेंजर थिंग्ज: द फर्स्ट शॅडो’ लिहिलंय, तसेच आमचे दिग्दर्शक जो राईट, ज्यांच्या कामाचं आम्ही नेहमीच कौतुक केलंय, अशा उत्तम टीमचे आम्ही खूप आभारी आहोत. त्यांनी काय बनवलंय हे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. हे स्ट्रेंजर थिंग्जच आहे, पण एका नव्या ढंगात, नवीन जागा, नवीन हिरो आणि खलनायक, आणि नवीन... बरं, यापेक्षा जास्त सांगण्याची आम्हाला परवानगी नाही. आता कास्टिंगकडे वळूया. तोपर्यंत, आकाशाकडे लक्ष ठेवा!"

शो रनर केट ट्रेफ्री म्हणाल्या, "डफर ब्रदर्सनी मला हॉलिवूडमध्ये पहिलं काम दिलं आणि तेव्हापासून हा प्रवास खूप छान राहिलाय. आता त्यांच्यासोबत आणि आमचे उत्तम दिग्दर्शक जो राईट यांच्यासोबत ‘स्ट्रेंजर थिंग्ज’चा हा नवा अध्याय लोकांसमोर आणणं माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. नेटफ्लिक्स आणि २१ लॅप्सच्या पाठिंब्यामुळे आम्हाला मूळ सिरीजमधील सर्व रहस्य आणि थरार पुन्हा अनुभवता आला. सोबतच आम्ही एक पूर्णपणे नवीन कथा सांगत आहोत, जी नक्कीच तुम्हाला चकित करेल आणि पुन्हा एकदा भावुक करेल. अजून खूप काही शोधायचं आहे. ‘अदर वर्ल्ड्स’मध्ये तुमचं स्वागत आहे."

नेटफ्लिक्सच्या युएस आणि कॅनडा स्क्रिप्टेड सिरीजच्या प्रमुख, जिनी होवे यांनीही यावर भाष्य केलं, "‘स्ट्रेंजर थिंग्ज’ हे नेहमीच चाहत्यांचं राहिलं आहे आणि त्यांच्या प्रेमामुळेच हे जगभर लोकप्रिय झालं. आज, ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ डेच्या निमित्ताने, मॅट, रॉस डफर आणि केट ट्रेफ्री यांच्यासोबत पुन्हा काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ‘अदर वर्ल्ड्स: अ स्ट्रेंजर थिंग्ज ॲडव्हेंचर’ प्रेक्षकांना १९५० च्या दशकात घेऊन जातं. यात नवीन हिरो आहेत आणि मूळ सिरीजमधला सगळा थरार आणि रहस्यही आहे. आम्ही डफर, केट, शॉन लेव्ही आणि जो राईट यांच्यासोबत हे विश्व आणखी विस्तारत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आणि चाहत्यांना हे दाखवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत."

२१ लॅप्सचे कार्यकारी निर्माते शॉन लेव्ही म्हणाले, "२१ लॅप्समध्ये आम्ही सर्वजण ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ची कथा पुढे नेण्यासाठी खूप उत्सुक आहोत. ‘अदर वर्ल्ड्स’च्या माध्यमातून डफर ब्रदर्स आणि केट ट्रेफ्री यांनी एक नवीन जग उभं केलंय. ज्यात आमच्या मूळ सिरीजचा आत्मा आहेच, पण सोबत एका नव्या युगाचा, नवीन पात्रांचा, विषयांचा आणि रहस्यमय गोष्टींचा वेधही घेतलाय. याची सुरुवात कदाचित हॉकिन्समध्ये झाली असेल, पण आता हा प्रवास थरार आणि भावनांच्या इतर विश्वात जाणार आहे."

(हेडलाईन वगळता, या बातमीत एशियानेट न्यूजच्या संपादकीय टीमने कोणताही बदल केलेला नाही आणि ही सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Ventilator 2 : प्रियांका चोप्राच्या गाजलेल्या मराठी सिनेमाचा सीक्वेल, 'व्हेंटिलेटर 2' ची घोषणा!
Salman Khan on Ramayana Movie : रामायणाची चर्चा कथेवर व्हावी, बजेट आणि VFX वर नाही, सलमान खानचं स्पष्ट मत