
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण आता तिच्या टीमने या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. सैफ अली खानसोबत ती तिसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याची बातमी खोटी आहे, असं तिच्या टीमने सांगितलंय. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
ही सगळी चर्चा एका व्हिडिओमुळे सुरू झाली. मुंबईतल्या वांद्रे भागातील एका जीमबाहेर करीना दिसली. या व्हिडिओमध्ये तिचा 'बेबी बंप' दिसत असल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं होतं. त्यातच तिच्या टीममधील एका व्यक्तीने तिला पापाराझींपासून वाचवण्यासाठी छत्री धरली होती, त्यामुळे या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि त्यावर चर्चा सुरू झाल्यावर करीना कपूरच्या टीमने लगेचच यावर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी या सगळ्या अफवा असल्याचं सांगत, यात काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरू नये, यासाठी टीमने तातडीने पाऊल उचललं.
करीनाच्या जवळच्या सूत्रांनीही या बातमीला नकार दिला आहे. एका सूत्राने सांगितलं, "करीना प्रेग्नंट नाही. ही बातमी खोटी आहे." तर दुसऱ्या एका सूत्राने गंमतीत म्हटलं की, "हा बेबी बंप नाही, तर पास्ता, पिझ्झा, सुट्ट्या आणि कॅमेऱ्याच्या चुकीच्या अँगलचा परिणाम आहे." नुकतीच करीना आणि सैफ, सैफचा ५६ वा वाढदिवस साजरा करून बीच हॉलिडेवरून परतले आहेत.
करीना कपूरसोबत असं पहिल्यांदाच घडलेलं नाही. २०२२ मध्येही तिच्या प्रेग्नंसीच्या अशाच अफवा पसरल्या होत्या. तेव्हा तिने इन्स्टाग्रामवर गंमतीत 'पास्ता आणि वाईन'मुळे असं दिसतंय, असं म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. एका मुलाखतीत तिने असंही सांगितलं होतं की, आता आणखी मुलं नकोत, असं तिने सैफला बजावलं आहे. करीनाला तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत. तिच्या टीमकडून वारंवार मिळणाऱ्या स्पष्टीकरणामुळे आता तरी या चर्चा थांबतील अशी आशा आहे.