
Priyanshu Kshatriya Murder: ‘झुंड’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खूनाने केवळ नागपूरच नव्हे, तर संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
ही घटना ७ ऑक्टोबरच्या रात्री नागपूरच्या जरीपटका भागात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांशूचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला. त्याच्या शरीराला तारेने बांधून ठेवलं गेलं होतं आणि धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. चाकूच्या अनेक जखमा त्याच्या शरीरावर दिसून आल्या. प्रियांशू गंभीर अवस्थेत आढळल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत लालबहादुर साहू या संशयिताला अटक केली आहे. गुन्ह्याचं नेमकं कारण काय, हे शोधण्यासाठी पोलीस तपास अधिक खोलवर सुरू आहे.
प्रियांशू क्षत्रियने नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमात बाबू नावाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्याचं नाव बॉलिवूडमध्ये झळकलं होतं. मात्र, पुढील काळात तो विवादास्पद वळणावर गेला. त्याच्यावर ५ लाख रुपयांच्या सोन्याच्या चोरीचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यात अटकही झाली होती. याशिवाय, इतर गुन्ह्यांच्याही संशयित यादीत त्याचं नाव होतं.
या घटनेने अनेकांना धक्का बसला असून, सोशल मीडियावर चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. एकेकाळी सिनेमाच्या पडद्यावर झळकलेला युवक, असं अचानक आणि अमानुषपणे संपेल, याची कुणालाही कल्पना नव्हती.