
Hema Malini Emotional Post After Dharmendra Death : बॉलिवूडमध्ये 'ही-मॅन' नावाने प्रसिद्ध असलेल्या धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांच्यावर बरेच दिवस उपचारही सुरू होते, पण डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी घाईघाईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पत्नी हेमा मालिनी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे पतीच्या आठवणीत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. हेमा यांची पोस्ट वाचून चाहते खूप भावूक होत आहेत आणि त्यावर कमेंट्स करून त्यांचे सांत्वन करत आहेत.
हेमा मालिनी यांनी पती धर्मेंद्र यांच्या आठवणीत एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले - ‘धरम जी, ते माझ्यासाठी खूप काही होते. प्रिय पती, आमच्या दोन मुली ईशा आणि अहाना यांचे वडील, मित्र, फिलॉसॉफर, मार्गदर्शक, कवी, गरजेच्या वेळी प्रत्येक क्षणी माझ्यासोबत असणारे - खरं तर, ते माझ्यासाठी सर्वकाही होते. ते नेहमी चांगल्या-वाईट काळात माझ्यासोबत राहिले. त्यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावाने माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आपलेसे केले होते, नेहमी त्या सर्वांबद्दल प्रेम आणि आपुलकी दाखवली. एक सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रतिभा, त्यांची लोकप्रियता असूनही त्यांची नम्रता आणि त्यांच्या सार्वत्रिक आकर्षणाने त्यांना सर्व दिग्गजांमध्ये एक अद्वितीय आयकॉन बनवले. चित्रपटसृष्टीतील त्यांची कीर्ती आणि यश नेहमीच कायम राहील. माझे वैयक्तिक नुकसान शब्दांत व्यक्त करता येणार नाही आणि आयुष्यात आलेली पोकळी माझ्या उर्वरित आयुष्यात राहील. अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर, माझ्याकडे अनेक खास क्षण पुन्हा जगण्यासाठी खूप आठवणी आहेत.’
भावनिक पोस्टसोबतच हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणीत त्यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये या जोडप्याचे अनेक सुंदर क्षण पाहायला मिळत आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी एकत्र ३१ चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यापैकी २० चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटांमध्ये शराफत, नया जमाना, राजा जानी, प्रतिज्ञा, जुगनू, ड्रीम गर्ल, चाचा भतीजा, अली बाबा और ४० चोर, बगावत, राजपूत, राजतिलक, शोले, सीता और गीता, दोस्त, चरस, आझाद, द बर्निंग ट्रेन इत्यादींचा समावेश आहे. दोघांचा एकत्र पहिला चित्रपट 'तुम हसीन मैं जवां' हा होता, जो १९७० मध्ये प्रदर्शित झाला होता.