
अमिताभ बच्चन यांचा बंगला 'जलसा', बीएमसी महापौरांचे कार्यालय आणि मुंबईतील इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांना गुरुवारी पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमध्ये मुंबई मेट्रो आणि महालक्ष्मी रेसकोर्सवरील दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टचाही उल्लेख आहे. हा कार्यक्रम २७ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे.
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या १८ व्या स्मृतिदिनी हा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. हा ईमेल महापौर रितू तावडे आणि बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांना उद्देशून होता. मुंबईत दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला परवानगी दिल्याच्या रागातून सलग ३० दिवस ग्रेनेड हल्ले करण्याची धमकी यातून देण्यात आली आहे.
तसेच, या ईमेलमध्ये खलिस्तान, १९८४ चा शीखविरोधी हिंसाचार, बब्बर खालसा (परमार-कॅनडा) आणि खलिस्तान नॅशनल आर्मी यांचाही उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर होणाऱ्या दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टच्या ठिकाणालाही यात लक्ष्य करण्यात आले आहे. या गायकाच्या बाबतीत अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याच्या बंगळुरू कॉन्सर्टसाठीही आयईडी (IED) स्फोटाचा इशारा देणारा असाच एक ईमेल आला होता. बंगळुरूतील मादवरा येथील नाईस (NICE) ग्राउंडवर २९ नोव्हेंबरला हा कार्यक्रम होणार आहे, जो मुंबईतील कॉन्सर्टच्या बरोबर दोन दिवसांनंतर आहे.
याआधी १२ नोव्हेंबरलाही असाच एक धमकीचा ईमेल आला होता. त्यामध्ये मुंबई विमानतळ, महापौरांचे कार्यालय, जलसा, पंजाब नॅशनल बँक शाखा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महालक्ष्मी स्टेडियम या प्रमुख ठिकाणांचा उल्लेख होता. या ईमेलनंर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.
आता २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या १८ व्या स्मृतिदिनी ही नवी धमकी आल्याने, या संवेदनशील काळात मुंबईच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.