
मुंबई : अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ याने शुक्रवारी मुंबईत झालेल्या त्याच्या कॉन्सर्टमधील कथित बॉम्बच्या धमकीवर भाष्य केलं आहे. त्याने चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि कार्यक्रमात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्याबद्दल मुंबई पोलिसांचेही विशेष आभार मानले. प्रेक्षकांशी बोलताना हा 'GOAT' गायक म्हणाला की, या धमक्यांना उत्तर म्हणून त्याच्याकडे फक्त प्रेमच आहे. त्याच्या मते, कॉन्सर्टला येणाऱ्यांची संख्या कमी व्हावी, हाच या धमक्यांमागचा मुख्य उद्देश होता. आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर करत दिलजीत म्हणाला, "त्यांचा उद्देश फक्त एकच आहे: लोकांनी दिलजीतच्या शोमध्ये येऊ नये, त्यांनी घाबरावे, त्यांना धमकावले जावे आणि कोणत्याही मार्गाने त्यांना थांबवले जावे. पण माझ्याकडून तुमच्यासाठी फक्त प्रेम आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बॉम्ब फेकू शकता, पण माझ्याकडून तुम्हाला नेहमी प्रेमच मिळेल." दिलजीत दोसांझ पुढे म्हणाला, "मला माहित आहे की जेवढे लोक इथे आहेत, तेवढेच लोक बाहेरही अडकले आहेत. पोलिसांचीही स्वतःची ड्युटी आणि बंधनं आहेत; ते प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना आत सोडत आहेत. तुमचे खूप खूप आभार. मुंबई पोलिसांचे विशेष आभार." View this post on Instagram A post shared by DILJIT DOSANJH (@diljitdosanjh)
दिलजीतच्या मुंबईतील कॉन्सर्टच्या एक दिवस आधी, गुरुवारी संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना एक धमकीचा ईमेल आला होता, ज्यामध्ये महापौरांचे कार्यालय, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला आणि शहरातील इतर ठिकाणी बॉम्बस्फोटाचा इशारा देण्यात आला होता. हा ईमेल महापौरांच्या कार्यालयात आला होता आणि त्यात महालक्ष्मी रेसकोर्स, सायन आणि आचार्य मेट्रो स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा दावाही करण्यात आला होता.
गायक दिलजीत दोसांझच्या बेंगळुरूमधील कॉन्सर्टपूर्वीही बॉम्बची धमकी आल्याची माहिती मिळाली आहे. कॉन्सर्टचे ठिकाण आणि जवळच्या मेट्रो स्टेशनवर संभाव्य स्फोटाचा इशारा देणारा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिलजीत २९ नोव्हेंबर रोजी रविवारी बेंगळुरूमध्ये त्याच्या AURA India Tour 2026 चा भाग म्हणून परफॉर्म करणार आहे. हा कॉन्सर्ट मादवरा येथील NICE ग्राउंड्सवर होणार आहे. दिलजीतच्या इंडिया टूरला अशा प्रकारची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. २३ ऑक्टोबर रोजी, माजी मुंबई महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयात आत्मघाती हल्ल्याचा इशारा देणारा ईमेल आल्याचे वृत्त होते. १५ नोव्हेंबर रोजी इंदूरमधील त्याच्या कॉन्सर्टपूर्वी, महापौरांचे कार्यालय, खाजगी शाळा आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठालाही बॉम्बच्या धमक्या पाठवण्यात आल्या होत्या. (