
मुंबई - दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलिपाला सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. यावेळी कारण ठरलं आहे, एका कार्यक्रमातील सोभिताचा वावर आणि त्यावरून सोशल मीडियावर उठलेली गरोदरपणाची शक्यता.
मुंबईतील बीकेसी येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘वेव्हज 2025’ या परिषदेच्या कार्यक्रमात नागा चैतन्य, सोभिता आणि नागार्जुन तिघेही सहभागी झाले होते. कार्यक्रमात सोभिताने नेसलेली सुंदर पारंपरिक साडी जितकी लक्षवेधी होती, तितकाच तिचा पदर हातात पकडून पोट झाकण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांना अधिक खटकला.
कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लगेचच चर्चेला उधाण आलं, "सोभिता गरोदर आहे का?" काहींनी स्पष्टपणे तिच्या वावरातून ‘बेबी बंप’ लपवण्याचा प्रयत्न असल्याचा अंदाज वर्तवला.
गेल्या काही महिन्यांपासून सोभिता सोशल मीडियावर नेहमीच सैल कपडे परिधान करून फोटो शेअर करत होती. यामुळे या चर्चेला अधिक बळ मिळालं. अनेकांनी विचारलं, "लग्नाच्या पाच महिन्यांतच गरोदरपण?" काहींनी तर अभिनंदनाच्या शुभेच्छाही पोस्ट केल्या.
सोशल मीडियावर चढलेल्या चर्चेवर आता अखेर धुलिपालांच्या जवळच्या एका व्यक्तीने 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना मौन सोडलं आहे. या व्यक्तीने स्पष्ट केलं, “सोभिताने सैल कपडे परिधान केले असले तरी ती गरोदर नाही. तिच्या राहणीशैलीचा आणि कपड्यांच्या निवडीचा चुकीचा अर्थ लावला जात आहे.” ही प्रतिक्रिया आल्यावर अनेक चाहत्यांनी अफवांचा माग सोडण्याचे आवाहन केले आहे.
हे प्रकरण केवळ एका अफवेपुरतं मर्यादित नाही. सेलिब्रिटींच्या प्रत्येक हालचालीवर समाजाचा बारीक लक्ष ठेवणं आणि त्यातून निष्कर्ष काढणं ही आजची दु:खद वास्तविकता आहे. महिलांच्या शरीराकडे केवळ ‘बंप’च्या दृष्टीने पाहणं, ही मानसिकता चिंताजनक ठरत आहे.
विशेषत: एका विवाहित अभिनेत्रीने पदर पकडून आपलं पोट झाकल्यावर लगेच तिच्या गरोदरपणाचा निष्कर्ष काढणं, हे खाजगी आयुष्यात शिरकाव करण्यासारखं आहे. यामुळे सेलिब्रिटींचा मानसिक आरोग्यही धोक्यात येताना दिसत आहे.