
अभिनेता आणि 'बिग बॉस ओटीटी 3' चा स्पर्धक विशाल पांडे शूटिंगदरम्यान एका जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावला. विशालने इंस्टाग्रामवर खुलासा केला की शूटिंगदरम्यान काचेमुळे त्याच्या नसा चुकून कापल्या गेल्या, ज्यामुळे त्याला दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. ही बातमी ऐकून त्याचे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहे.
विशाल पांडेने लिहिले, 'अपघात तुम्हाला धक्का देऊ शकतात. शूटिंगदरम्यान, चुकून काचेने माझी नस कापली गेली. अभिनयासारखी माझी सर्वात आवडती गोष्ट करताना असं काही होईल, याचा मी कधी विचारही केला नव्हता. दोन शस्त्रक्रियांनंतर, मी इथे आहे, सर्व काही थांबले आहे, सर्व काही पुढे ढकलावे लागले आहे. जो कोणी आपल्या स्वप्नातील शरीर आणि स्वप्नातील करिअर घडवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यासाठी हा सर्वात कठीण दिवसांपैकी एक आहे. यावेळी डॉक्टरांनी मला एक अशी गोष्ट सांगितली, ज्यामुळे मी आजही थरथर कापतो. हृदयापर्यंत जाणारी माझी धमनी काही इंचाच्या अंतरावरून वाचली आहे. नाहीतर माझ्या शरीराचा अर्धा भाग अर्धांगवायूग्रस्त झाला असता. ते म्हणाले की हे माझे नशीबच होते की मी वाचलो आणि मी फक्त विचार करतो की मला दररोज माझे कुटुंब, मित्र आणि तुम्हा सर्वांकडून किती आशीर्वाद मिळतात.
तरीही, तुम्ही मला या फोटोंमध्ये हसताना पाहाल. का? कारण एकदा का मी पूर्णपणे बरा झालो की, कोणीही आणि काहीही मला थांबवू शकणार नाही. या परिस्थितीतही मी थांबणार नाही. हा छोटासा धक्का मला बदलणार नाही, तो मला ऊर्जा देईल. जसे म्हणतात, सूर्य नेहमी पुन्हा उगवतो आणि मीही तसेच करेन.' विशालची ही पोस्ट पाहिल्यानंतर लोक तो लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा देत आहेत.
विशाल पांडे सुरुवातीला टिकटॉक आणि इंस्टाग्राम रील्सवरील त्याच्या कॉमिक स्किट आणि डान्स व्हिडिओसाठी ओळखला जातो. तथापि, 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये भाग घेतल्याने त्याला खरी ओळख मिळाली. अलीकडेच, विशालने त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट 'फार अवे फ्रॉम होम' सह कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती.