
बिग बॉस २० च्या 'वीकेंड का वार'मध्ये यावेळी रोहित शेट्टी होस्ट म्हणून आला आहे. त्याने येताच स्काऊटओपी आणि लव्हप्रीत कौर गिल (लव्ह गिल) यांच्या वाढत्या मैत्रीवर निशाणा साधला. जिओ हॉटस्टारने नुकताच एक प्रोमो रिलीज केलाय. यात रोहित या दोघांना त्यांच्या घरातील शारीरिक जवळीकीवरून थेट प्रश्न विचारताना दिसतोय. टीव्हीवर हे सगळं खूप चुकीचं दिसतंय, हे त्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं.
सलमान खान काही आधीच्या कमिटमेंट्समुळे या आठवड्यात होस्टिंग करत नाहीये. त्यामुळे रोहित शेट्टीने सूत्रे हाती घेतली असून, त्याने विचारलेल्या प्रश्नांमुळे हा 'वीकेंड का वार' चांगलाच रंगणार आहे.
प्रोमोमध्ये रोहित लव्हप्रीतला विचारतो की, स्काऊटओपी तिच्यासाठी कोण आहे. यावर लव्ह सांगते की, स्काऊटओपी तिच्या भावासारखा आहे. पण रोहित लगेच तिला आठवण करून देतो की, स्काऊट तिचे पाय, हात आणि मान दाबून देतो, तेही ब्लँकेटखाली. प्रेक्षकांना हे सगळं कसं दिसत असेल, असा थेट सवाल रोहितने केला.
रोहित लव्हला स्पष्ट सांगतो की, जेव्हा ती स्काऊटला तिचे पाय दाबायला सांगते, तेव्हा टीव्हीवर हे दृश्य अजिबात चांगलं दिसत नाही.
स्वतःची बाजू सावरताना स्काऊट म्हणतो की, जेव्हा घरातील दुसरी स्पर्धक माही विज त्याला मसाज करायला सांगते, तेव्हा तो तिलाही मसाज करून देतो. पण रोहितने स्काऊट आणि लव्हच्या या शारीरिक जवळीकीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.
हा प्रोमो समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी रोहितने घेतलेल्या थेट भूमिकेचं कौतुक केलं आहे. या दोघांमधल्या गोष्टी आता खूप पुढे गेल्या आहेत, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
या सगळ्या वादानंतर आता आणखी एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे स्काऊटच्या गर्लफ्रेंडची. स्काऊटची गर्लफ्रेंड काश्वी हिरानंदानी बिग बॉस २० च्या आगामी 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
बिग बॉस २० हा शो कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता आणि जिओ हॉटस्टारवर रात्री ९ वाजता पाहता येतो.