
भारतीय सिनेमाला जगभरात प्रमोट करण्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात 'इफ्फी' (IFFI) ची भूमिका खूप महत्त्वाची आहे, असे मत दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले. भारतीय सिनेमाच्या सर्व प्रतिनिधींनी या महोत्सवाला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ५७ व्या इफ्फी महोत्सवात सहभागी होण्यासाठी अनुपम खेर गोव्यात आले आहेत. एएनआय (ANI) शी बोलताना ते म्हणाले, "मला वाटतं, इफ्फी आता जगातल्या सर्वात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी एक बनला आहे. जगभरातील प्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक यांच्या सहभागामुळे या महोत्सवाला एक प्रतिष्ठेचे व्यासपीठ मिळाले आहे. इथले सेमिनार, चर्चासत्रे, फिल्म बाजार, फिल्म प्रीमियर आणि पॅनोरमा सिनेमे हे सगळंच भन्नाट आहे. आपण सर्वांनी भारतीय सिनेमाचे प्रतिनिधी म्हणून या महोत्सवात सहभागी होऊन त्याला प्रमोट करायला हवे."
यंदाच्या इफ्फीमध्ये ८६ देशांमधील १५० हून अधिक सिनेमे दाखवले जाणार आहेत. जगभरातील वेगवेगळ्या कथा आणि भावनांच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचे काम सिनेमा करतो, हेच यातून दिसते. यंदा या महोत्सवात ९ वर्ल्ड प्रीमियर, २ इंटरनॅशनल प्रीमियर, २४ एशियन प्रीमियर आणि ११६ इंडियन प्रीमियर होणार आहेत. यामुळे प्रेक्षकांना विविध देश, संस्कृती आणि पिढ्यांचे सिनेमे पाहण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यात आनंद एल. राय यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्युरींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बोगडान मुरेशानू, सोल बेरुएझो पिचोन-रिव्हिएरे, मारिया अलेजांड्रा रोजास आणि रॅचपूम बूनबंचचोक या ज्युरी सदस्यांचा समावेश होता. तसेच, इंडियन पॅनोरमा फीचर आणि नॉन-फीचर फिल्म विभागाचे अध्यक्ष अनुक्रमे मधुर भांडारकर आणि हिमांशू शेखर खटुआ यांचाही सन्मान करण्यात आला. भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय मार्केट मिळवून देणाऱ्या 'वेव्हज फिल्म बाजार' च्या (WAVES Film Bazaar) २० व्या पर्वाची सुरुवातही २० नोव्हेंबर रोजी गोव्यात झाली. ५७ वा इफ्फी महोत्सव २८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.