Aamir Khan Wedding : २५ वर्षांची मैत्री, नंतर प्रेम आणि लग्न.... आमिर खान-गौरी स्प्राट विवाहबद्ध, पहिला फोटो समोर

Published : Jul 05, 2026, 02:10 PM IST
Aamir Khan and Gauri Spratt are now married

सार

Aamir Khan Gauri Spratt Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आज ५ जुलै रोजी गौरी स्प्राटसोबत विवाहबद्ध झाला आहे. घरातच हा लग्नसमारंभ पार पडला. दोघांनी रजिस्टर्ज मॅरेज केलं आहे. 

मुंबई : बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान आज ५ जुलै रोजी विवाहबद्ध झाला. ६१ वर्षीय आमिरने आज गौरी स्प्राटसह रजिस्टर्ड मॅरेज पद्धतीने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. अतिशय साध्या पद्धतीने आमिर खानच्या घरातच हे लग्न पार पडलं. लग्नात दोन्ही कुटुंबातील केवळ जवळचे नातेवाईक आणि त्यांची मुलं सहभागी होती. आज विवाहबद्ध झालेलं हे जोडपं मागील जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होतं. पण आमिर खानची, गौरी स्प्राटसोबत पहिल्यांदा भेट, त्यांची लव्हस्टोरी कधी आणि कशी सुरू झाली होती?

आमिर खानने त्याच्या ६०व्या वाढदिवशी गौरीला पहिल्यांदा सार्वजनिकरित्या सर्वांसमोर आणलं. आपली जोडीदार म्हणून त्याने तिची ओळख करुन दिली होती. त्याआधी दोघं काही काळ डेट करत होते. पण आज लग्न केलेले आमिर आणि गौरी मागील तब्बल २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मधल्या काळात त्यांचा संपर्क नव्हता. मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांची अचानक भेट झाली. पुढे मैत्री आणि नंतर मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. आज दोघांनी आपल्या आयुष्याशी आपल्या जोडीदारासह नव्याने सुरुवात केली आहे.

गौरीआधी आमिरचं किरण राव आणि रिना दत्ता यांच्याशी लग्न झालं होतं. मात्र काही कारणांनी आमिरचं या दोघींसोबतचं नातं लग्नाच्या काही वर्षांनी तुटलं. असं असलं तरी आमिरसोबत किरण राव आणि रिना दत्ता यांची चांगली मैत्री आहे. काही दिवसांपूर्वी आमिर, गौरी आणि त्याच्या एक्स वाईफ एकत्र दिसल्या होत्या.

कोण आहे गौरी?

गौरी बंगळुरू इथे राहणारी आहे. तिचं बॉलिवूडमध्ये कोणतंही कनेक्शन नाही. ती व्यावसायिका आहे. फॅशन आणि ब्यूटीमध्ये तिने उच्च शिक्षण घेतलं आहे. लंडन यूनिव्हर्सिटीमधून तिने फॅशन आणि फोटोग्राफीचं शिक्षण पूर्ण केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या गौरी बी-ब्लंट या सलॉनची पार्टनर आणि डायरेक्टर आहे.

आमिर खानचं गौरीसोबत हे तिसरं लग्न आहे. तर गौरीचं हे दुसरं लग्न आहे. आमिरला आधीच्या लग्नापासून एक मुलगी आणि दोन मुलगे अशी तीन मुलं आहेत. तर गौरीचं देखील आधी लग्न झालेलं होतं. तिला एक ६ वर्षांचा मुलगा आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

नॅशनल क्रश गिरीजा ओक बडिलांबद्दल काय म्हणाली, नात्याबद्दल केला खुलासा
Eetha Movie : विठाबाईंच्या गावात जाणार श्रद्धा कपूर! 'ईठा'च्या रिलीजपूर्वी मोठी तयारी