
मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान 'ललकारा' या त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारीसाठी त्याची पार्टनर गौरी स्प्राट्ट सोबत मुंबईतील कुलाबा परिसरातील एका आलिशान फ्लॅटमध्ये राहायला गेल्याचं बोललं जात आहे. त्याच्या वांद्रे येथील घराचं काम सुरू असल्याने अभिनेत्याने काही काळासाठी ते घर सोडलंय. मात्र त्याच्या या नव्या घराचा त्याला एक व्यावसायिक फायदाही झालाय. यामुळे त्याला क्रिकेटच्या मैदानात लवकर पोहोचता येणार आहे, जिथे तो त्याच्या मोठ्या पडद्यावरच्या पुढच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी सराव करत आहे.
मिड-डे च्या वृत्तानुसार, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी स्पोर्ट्स ड्रामा सिनेमासाठी, आमिर एका अत्यंत व्यग्र सराव सत्राचे वेळापत्रक पाळत आहे आणि त्यासाठीच तो दक्षिण मुंबईतल्या क्रिकेट फॅसिलिटी जवळ राहायला गेलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, सोय आणि चित्रपटाच्या कमिटमेंट्स यामुळे त्याने हा निर्णय घेतलाय. वांद्रे येथील घराचं नूतनीकरण सुरू असल्यामुळे आमिर आणि गौरी कुलाब्यातल्या एका सुंदर प्रॉपर्टीमध्ये राहायला गेले आहेत.
हा परिसर अभिनेत्याला त्याच्या क्रिकेटच्या सरावाला पोहोचण्यासाठी जास्त सोयीचा ठरतोय. ऐतिहासिक १९५२ च्या भारत-पाकिस्तान कसोटी मालिकेवर आधारित 'ललकारा' या सिनेमात आमिर भारताचे प्रसिद्ध क्रिकेटर लाला अमरनाथ यांची भूमिका साकारणार आहे.
या भूमिकेच्या तयारीसाठी आमिर एका डायटिशियनने आखून दिलेल्या काटेकोर फिटनेस आणि शाकाहारी आहाराचे पालन करत असल्याचं वृत्त आहे.
या सिनेमाची तयारी आमिर एकटाच करत नाहीये. त्याचे सहकलाकार विक्रांत मेस्सी, जितेंद्र कुमार आणि धैर्य करवा हे सुद्धा दक्षिण मुंबईतील एका ऐतिहासिक क्लबमध्ये क्रिकेटचा सराव करत आहेत.
विशेष म्हणजे, दोन माजी भारतीय क्रिकेटर या कलाकारांना क्रिकेटचं प्रशिक्षण देत आहेत असं म्हटलं जातंय. त्यांनीच कबीर खानच्या २०२१ च्या स्पोर्ट्स ड्रामा '८३' मधल्या कलाकारांना सुद्धा ट्रेन केलं होतं. हा सिनेमा भारताच्या ऐतिहासिक क्रिकेट वर्ल्ड कप विजयावर आधारित होता.
आमिर या सिनेमात स्वातंत्र्यानंतरचे भारताचे पहिले कसोटी कर्णधार लाला अमरनाथ यांची भूमिका साकारणार आहे, तर विक्रांत मेस्सी हा पाकिस्तानचा माजी कर्णधार अब्दुल हफीज कारदार याच्या भूमिकेत दिसणार आहे.
सिनेमाच्या पूर्वतयारीत स्क्रिप्ट रिडिंग, लूक टेस्ट्स आणि रायटिंग टीमसोबतच्या चर्चांचा समावेश असल्याचं बोललं जातंय. आमिरने लेखक पियूष मिश्रा आणि नीरज सिंग यांचीही भेट घेतली, ज्यांनी मिळून या सिनेमाची गोष्ट, स्क्रिप्ट आणि डायलॉग्सवर काम केलंय.
सिनेमाचं शूटिंग ४ जानेवारी २०२७ ला सुरु होण्याची शक्यता आहे. एक खास योगायोग म्हणजे ही तारीख आमिर आणि आशुतोष गोवारीकर यांच्यासाठी विशेष आहे. ४ जानेवारी २००० रोजी या जोडीने त्यांच्या २००१ च्या प्रसिद्ध 'लगान' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली होती.
१९५२ साली फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या क्रिकेट मालिकेवर 'ललकारा' सिनेमा आधारलेला आहे. लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वात भारताने ही मालिका २-१ ने जिंकली होती.याआधी आमिर खान आणि आशुतोष गोवारीकर यांनी भारतीय सिनेमातल्या सर्वात गाजलेल्या स्पोर्ट्स ड्रामा 'लगान' मध्ये एकत्र काम केलं होतं. क्रिकेटचं ट्रेनिंग, आहारातील बदल आणि तात्पुरतं घर बदलून आमिर त्याच्या या आगामी ऐतिहासिक स्पोर्ट्स ड्रामा सिनेमासाठी खूप मेहनत घेताना दिसतोय.