Wardha Crime : वर्ध्यात जमिनीच्या वादातून पुतण्याने काकू-चुलत भावाची केली हत्या, नंतर स्वतःही विष पिवून संपवले जीवन!

Published : Jun 28, 2025, 09:47 PM IST
crime scene

सार

वर्धा जिल्ह्यातील निमसडा येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने काकू आणि चुलत भावाची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वर्धा: जमिनीच्या वादातून रक्ताचे नाते संपल्याची एक मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील निमसडा येथील शेतशिवारात आज सकाळी घडली. पुतण्याने आपल्या काकू आणि चुलत भावाची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही विषप्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

निमसडा येथील रहिवासी साधना मोहिजे (वय ५५) आणि त्यांचा मुलगा नितीन मोहिजे (वय २७) हे दोघे सकाळी आपल्या शेतात कामासाठी गेले होते. याचवेळी त्यांचा पुतण्या तथा भाऊ महेंद्र मोहिजे (वय ४५) तिथे आला. शेतजमिनीच्या जुन्या वादामुळे त्यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, महेंद्रने कुऱ्हाडीने साधना मोहिजे आणि नितीन मोहिजे यांच्यावर वार करत त्यांची हत्या केली. या दुहेरी हत्याकांडानंतर महेंद्र मोहिजेने लगेच विषप्राशन केले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलीस दलाची धावपळ

या घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर ठाण्याचे ठाणेदार विजय घुले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, पोलीस अपर अधीक्षक सागर कवडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व माहिती घेतली.

या थरारक घटनेमुळे निमसडा गाव आणि आसपासच्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्लीपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जमिनीच्या एका क्षुल्लक वादातून तीन लोकांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

US : STI च्या वादावरुन अमेरिकन विद्यार्थ्याकडून प्रेयसीवर चाकू हल्ला, हत्येप्रकरणी ठरला दोषी
गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून