श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी घातलेल्या एका मोठ्या कारवाईत, बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या कमांडर उस्मान भाईला ठार मारण्यात यश आले आहे. श्रीनगर शहरात दोन वर्षांत झालेली ही पहिलीच दहशतवादीविरोधी कारवाई आहे.
विशेष म्हणजे उस्मानच्या हत्येत 'बिस्किट' या कुरकुरीत खाद्यपदार्थाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो ज्या ठिकाणी राहत होता तेथे मोठ्या संख्येने भटके कुत्रे होते आणि त्यांच्या भुंकण्याने दहशतवादी जागा होऊन पळून जाण्याची शक्यता होती. म्हणूनच जवानांनी बिस्किटे देऊन भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंडे बंद केली आणि आपले लक्ष्य गाठण्यात यशस्वी झाले.
हत्या कशी झाली?: निरीक्षक मनसूर वानी यांच्या हत्येसह अनेक प्रकरणांमध्ये उस्मानचा सहभाग होता. अनेक वर्षांपासून राज्यात सक्रिय असलेला उस्मान श्रीनगरच्या खानयार या दाट लोकवस्तीच्या भागात लपून बसला होता, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शनिवारी कारवाई केली. यावेळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी त्याला ठार मारले. कुत्रे भुंकू नयेत म्हणून बिस्किटांचा वापर करण्यात आला.
'श्रीनगर शहरात दोन वर्षांत झालेली ही पहिलीच कारवाई असून, त्याची हत्या आमच्यासाठी एक मोठे यश आहे. लष्करचा एक ज्येष्ठ कमांडर असलेल्या त्याच्या हत्येमुळे लष्करला मोठा धक्का बसला आहे,' असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या आणखी एका कारवाईत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारले.