स्कायडायव्हिंग प्रशिक्षकाचा ८२० फूट खाली पडून मृत्यू; धावताना तोल गेला

दृक्‌साक्षींनी सांगितले की, उंच कड्यावरून उडी मारताना लिमाचा तोल गेला आणि तो खाली पडला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.


स्कायडायव्हिंगसाठी धावत असताना प्रशिक्षक ८२० फूट खाली पडून मृत्यूमुखी पडला. ब्राझीलमधील सावो कॉनराडो येथील स्कायडायव्हिंग प्रशिक्षक जोस डी अ‍ॅलेंकर लिमा ज्युनियर (४९) यांचा कड्यावरून खाली कोसळून मृत्यू झाला. पॅराग्लायडिंगसारख्या एअर स्पोर्ट्स स्पीड फ्लायसाठी पॅराशूट घेऊन कड्यावरून धावत असताना लिमाचा तोल गेला आणि तो ८२० फूट खाली कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ब्राझिलियन आर्मीच्या पॅराशूट इन्फंट्री ब्रिगेडमध्ये पॅराट्रूपर म्हणून काम केलेले लिमा हे अनुभवी स्कायडायव्हिंग प्रशिक्षक होते.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, उंच कड्यावरून उडी मारताना लिमाचा तोल गेला आणि तो खाली पडला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताच्या वेळी लिमाचे पॅराशूट उपकरण योग्यरित्या कार्य करत नव्हते, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, पेड्रा बोनिटामध्ये पॅराग्लायडिंग उड्डाणे आयोजित करणार्‍या सावो कॉनराडो डी व्होओ लिव्हरे (सीएससीएलव्ही) क्लबने सांगितले की, लिमाने योग्य वेळी उडी मारली नाही. "टेकऑफसाठी पायलटने रॅम्प वापरला नाही. टेकऑफसाठी त्याने निवडलेले ठिकाण चुकीचे आणि अनधिकृत होते. या घटनेसाठी सीएससीएलव्ही जबाबदार नाही. पायलटला शांती मिळो," असे सीएससीएलव्हीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

 

 

"काय झाले ते आम्हाला माहित नाही. पण तो २० वर्षांपासून व्यावसायिक स्कायडायव्हर होता. तो अनुभवी होता. ही एक दुर्घटना होती. लिमाने पेड्रा बोनिटावरून उडी मारली का हे मला माहित नाही," असे लिमाच्या वहिनीने माध्यमांना सांगितले. गेल्या महिन्यात ब्राझीलमधील बोइतुवा येथे स्कायडायव्हिंग करताना चिलीच्या एका तरुणीचा मृत्यू झाला होता. ४० वर्षीय कॅरोलिना मुनोज केनेडीचा तोल गेल्याने ती जमिनीवर आदळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Share this article