
Sangli: सांगली जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी दुर्घटना घडली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात एकाच कुटुंबातील दोन महिलांसह चौघांनी सामुदायिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. बापलेकाला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती कवठेमंकाळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नांगोळे येथे बाळासाहेब उर्फ अल्लाउद्दीन पाटील यांचे कुटुंब राहते. त्यांची दोन ठिकाणी घरे असून मुलगा, सून आणि दोन नातू तर दुसऱ्या घरात अलाउद्दीन पाटील पत्नीसह राहत असायचे. शुक्रवारी सर्वजण घरी असताना सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न झाला सून काजल समीर पाटील, वय 30, आणि सासू रमेजा अल्लाउद्दीन पाटील, वय 45, या दोघींचा जागीच मृत्यू झाला; तर अल्लाउद्दीन आणि समीर या दोघांनाही बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अलाउद्दीन यांचा शेती व्यवसाय असून त्यांच्या मागे जनावरांच्या गोठ्यात कोणीतरी पूजा केली होती, त्यामुळं आपल्या घरात त्रास वाढायला लागल्याचं त्यांनी म्हटलं होत. त्यांच्या मनात हा ग्रह झाला होता असं गावकऱ्यांचे म्हणणं आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या प्रकारानंतर सामाजिक संस्थांनी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत गावात समुपदेशन आणि मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी मोहिम सुरू करणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक लोकांनी व्यक्त केले आहे. अशा अंधश्रद्धा आणि मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रशासनाने या घटनेचा गांभीर्याने विचार करून मानसोपचार तज्ज्ञांची मदत, ग्रामसभा आणि कुटुंबांशी थेट संवाद यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही जोर धरत आहे.