
Sangali Crime : सांगली शहरात मध्यरात्रीच्या सुमारास मुळशी पॅटर्नप्रमाणे थरारक खुनाची घटना घडली आहे. राजकीय पदाधिकारी उत्तम जिनाप्पा मोहिते (वय ४१, रा. गारपीर चौक, सांगली) यांचा त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजजवळ धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजता घडली. या घटनेने सांगली शहर हादरून गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम मोहिते हे दलित महासंघ (मोहिते गट) चे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी सांगली जिल्ह्यात विविध सामाजिक आणि राजकीय आंदोलनं केली होती. त्यांच्या हटके आंदोलनशैलीमुळे ते ओळखले जात होते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गारपीर चौक येथे स्टेज लावून मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री सुमारास संशयित शाहरुख शेख आणि त्याचे साथीदार कार्यक्रमस्थळी आले, जेवणाचा आस्वाद घेतला आणि नंतर शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने मोहिते यांच्या जवळ गेले. त्याचवेळी धारदार हत्याराने पोटात आणि मानेवर वार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला.
या हल्ल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. संशयित शेख आणि मोहिते गटामध्ये मोठी धुमश्चक्री झाली. दरम्यान, संतप्त जमावाने आरोपी शाहरुख शेख याला बेदम मारहाण केली, यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जखमी अवस्थेत उत्तम मोहिते यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर सांगली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालय परिसरात दाखल झाले. समर्थकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी केली, तर सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा रंगली. दरम्यान, मध्यरात्रीपर्यंत पोलिस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल झाल्याची नोंद नव्हती.