Punjab Drug Racket: लहान मुलांना लावलं ड्रग्जचं व्यसन, पंजाबमध्ये धक्कादायक प्रकार उघड

vivek panmand   | CMS
Published : Oct 24, 2026, 06:20 PM IST
photo

सार

कपूरथला पोलिसांनी एका ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. पोलिसांचा संशय टाळण्यासाठी हा तस्कर लहान मुलांना ड्रग्जच्या आहारी लावून त्यांच्याकडून ड्रग्जची विक्री करून घेत होता, अशी धक्कादायक कबुली त्याने दिली आहे.

कपूरथला पोलिसांनी एका ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. पोलिसांचा संशय टाळण्यासाठी हा तस्कर लहान मुलांना ड्रग्जच्या आहारी लावून त्यांच्याकडून ड्रग्जची विक्री करून घेत होता, अशी धक्कादायक कबुली त्याने दिली आहे. एका १३ वर्षांच्या मुलाचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर पोलिसांनी त्या मुलाची आणि त्याच्या १० वर्षांच्या भावाची सुटका केली. सध्या या दोन्ही भावंडांना सिव्हिल हॉस्पिटलमधील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

ही दोन्ही मुलं झुग्गियां राजपूर गावातली आहेत. त्यांच्या वडिलांचं निधन झालं असून आई अत्यंत गरिबीत दिवस काढत आहे. त्यामुळे या कुटुंबाची अवस्था खूपच बिकट आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही मुलं अनेकदा गावातल्या इतर लोकांकडे जेवण मागायला जायची.

सुभानपूरचे एसएचओ अमनदीप नाहर यांनी सांगितलं की, आरोपी परमजीत सिंग हा होशियारपूरचा रहिवासी आहे. तो गावात एका महिलेला भेटायला यायचा, जिला तो आपली बहीण मानायचा.

चौकशीदरम्यान परमजीतने सांगितलं की, त्यानेच सुमारे दोन आठवड्यांपूर्वी या मुलांना ड्रग्ज घेण्यास प्रवृत्त केलं होतं आणि त्या घटनेचा व्हिडिओही रेकॉर्ड केला होता.

"त्याने मुलांना हेरॉईन दिलं होतं. या वयाच्या मुलांवर पोलीस सहसा संशय घेत नाहीत, त्यामुळे ड्रग्जची तस्करी करण्यासाठी त्याला या मुलांचा वापर करायचा होता," असं एसएचओ म्हणाले.

बुधवारी संध्याकाळी पोलिसांना हा व्हायरल व्हिडिओ मिळाला आणि त्याच रात्री त्यांनी परमजीतला बेड्या ठोकल्या. उपचारांसाठी आणि पुनर्वसनासाठी दोन्ही मुलांना त्याच संध्याकाळी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आलं.

कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल बोलताना नाहर म्हणाले, "गावातले बहुतांश लोक खूप गरीब आहेत. ही दोन मुलं अनेकदा गावातल्या इतर कुटुंबांकडून जेवण मागायची."

परमजीतला ड्रग्ज पुरवणाऱ्या आणखी एका आरोपीची पोलिसांनी ओळख पटवली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस आता ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या नेटवर्कचा शोध घेत आहेत.

PREV
Crime News (गुन्हे बातम्या): Read Crime News LIVE Updates, Check पुणे क्राईम न्यूज, ठाणे क्राईम न्यूज, मुंबई क्राईम न्यूज & other trending news in Marathi at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Greater Noida Robbery: ग्रेटर नोएडातील फ्लॅटमध्ये चोरी, चोरांनी मारली ब्लॅक लेबलची बाटली
Viral Video: क्रिकेटच्या मैदानात अचानक आलं माकड, १५ वर्षांच्या खेळाडूची उडाली तारांबळ!