
पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) हवेली तालुक्यातील उरुळी कांचनमध्ये एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसं आणि दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. या सगळ्या हत्यारांची किंमत सुमारे ५१,२०० रुपये इतकी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण एटीएसचं पथक बुधवारी उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होतं. त्यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक निलेश कदम आणि महेश गायकवाड यांना एक गुप्त माहिती मिळाली. उरुळी कांचन-दालिंब रोडवर असलेल्या सदानंद बेकरीजवळ एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन थांबला असल्याची ही माहिती होती.
या माहितीच्या आधारे एटीएस पथकाने लगेच त्या ठिकाणी धाव घेतली. तिथे भाऊसो उर्फ भावड्या भगवान महाडिक (वय ३४, रा. खुडे वस्ती, दालिंब रोड, दौंड तालुका, मूळ रा. शिंदवणे, हवेली तालुका) हा पळून जाण्याच्या तयारीत होता. पथकाने त्याला वेळीच पकडून ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसं आणि दोन कोयते सापडले.
विनापरवाना बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी महाडिकवर उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर शस्त्र कायद्याच्या कलम ३, ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महाडिक हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. याआधीही त्याच्यावर यवत पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल आहे. बोरी भडक येथील आयटीआय परिसरात त्याने आपल्या पाच साथीदारांसह एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं होतं. या प्रकरणाची सुनावणी सध्या दौंड न्यायालयात सुरू आहे.
दरम्यान, महाडिक ही शस्त्रं घेऊन का फिरत होता आणि त्याचा वापर एखाद्या गुन्हेगारी कृत्यासाठी होणार होता का, याचा पोलीस आता तपास करत आहेत. उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तरडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एटीएस पथकात सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, निलेश कदम आणि कर्मचारी रवींद्र जाधव, मोहसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक यांचा समावेश होता.
बेकायदेशीर शस्त्रं बाळगणारे, अमली पदार्थांची विक्री करणारे आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असं पुणे ग्रामीण एटीएसने स्पष्ट केलं आहे. (एएनआय)