रक्ताच्या नात्याला काळीमा, जमीनवादातून चुलत्याचा निर्घृण खून; ‘क्राईम पेट्रोल’ पाहून सुचली हत्या!

Published : May 17, 2025, 07:56 PM IST
crime news

सार

पाचोड तालुक्यात चुलत्याचा निर्घृण खून करून मृतदेह विहीरीत फेकण्याची घटना घडली. पोलिसांनी आठ दिवसांच्या तपासानंतर दोन आरोपींना अटक केली असून, जमिनीचा वाद हे हत्येमागचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाचोड: जे नातं विश्वासाचं असतं, जिथं सुरक्षिततेचा आधार असतो, त्या रक्ताच्या नात्यालाच काळीमा फासणारी एक संतापजनक घटना पाचोड तालुक्यात उघडकीस आली आहे. चुलत्याचा निर्घृण खून करून त्याचं मुंडकं धडापासून वेगळं करत मृतदेह विहीरीत फेकण्याचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. ही घटना पैठण तालुक्यातील चिंचाळा गावात घडली असून, पोलिसांनी आठ दिवसांच्या तपासानंतर या गुन्ह्याचा उलगडा करत चुलते-पुतण्याच्या नात्याला कलंकित करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे.

झोपेतून उठवून थेट मृत्यूकडे...

मृत नामदेव एकनाथ ब्रम्हराक्षस (वय ६५), हे बीड जिल्ह्यातील न्यायालयातून लिपिक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर आपल्या गावाकडे म्हणजे चिंचाळा येथे पत्नीसमवेत शेतात घर बांधण्याच्या उद्देशाने आले होते. ९ मेच्या पहाटे तीनच्या सुमारास, त्यांच्या पुतण्यांनी चोरटे आलेत, चला पाहूया असा बनाव रचत त्यांना झोपेतून उठवलं आणि विहीरीकडे घेऊन गेले.

तिथेच एकाने गळा आवळून पकडला, तर दुसऱ्याने कोयत्याने मुंडके धडापासून वेगळं केलं, आणि मृतदेह विहीरीत फेकला. सकाळी उठल्यावर कुटुंबीयांना नामदेव ब्रम्हराक्षस दिसले नाहीत. शोधाशोध केल्यावर त्यांच्या शेतातील विहीरीत मुंडक्याविना मृतदेह तरंगताना आढळला. पाणी उपसल्यानंतर मुंडके विहीरीच्या तळाशी सापडले.

जमिनीचा वाद आणि ‘क्राईम पेट्रोल’चा प्रभाव

या हत्येमागे जमिनीचा वाद कारणीभूत असल्याचं तपासात स्पष्ट झालं. काही वर्षांपूर्वी नामदेव ब्रम्हराक्षस यांनी आपल्या भावाकडून दीड एकर जमीन खरेदी केली होती. कालांतराने त्या भावाची आर्थिक स्थिती सुधारल्यावर त्याने ती जमीन परत मागितली. त्यावरून वाद निर्माण झाला.

शिवाय, मयत नामदेव हे जमिनीत १५ गुंठे अधिक घेतल्याचा गैरसमजही या हत्या घडवण्यास कारणीभूत ठरला. याच रागातून बाबासाहेब (वय ३३) आणि आबासाहेब (वय ३०) ब्रम्हराक्षस या दोघा भावांनी कट रचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अमानुष कृत्याची प्रेरणा त्यांना 'क्राईम पेट्रोल' मालिकेमधून मिळाल्याचं त्यांनी चौकशीत कबूल केलं.

शिताफीने उकलला गुन्हा

या खुनाची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाला सुरूवात केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ आणि त्यांच्या टीमने अविरत मेहनत घेऊन आठ दिवसांत या थरारक गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी या दोघा आरोपींना अटक करून पैठण न्यायालयात हजर केले असता, त्यांना २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत.

थोडक्यात...

खूनाचं कारण: दीड एकर जमिनीवरून निर्माण झालेला वाद

पद्धत: ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेतील कथेतून प्रेरणा, झोपेतून उठवून विहीरीपाशी नेऊन कोयत्याने हत्या

गुन्हेगार: मयताचे चुलत पुतणे – बाबासाहेब व आबासाहेब ब्रम्हराक्षस

कारवाई: पोलिसांकडून अटक, न्यायालयाकडून पोलिस कोठडी

या घटनेने नातेसंबंधांवरचा विश्वास हादरवणारा संदेश दिला आहे. जमिनीच्या वादातून एवढ्या थरारक आणि अमानुष हत्येची कल्पना देखील सुन्न करणारी आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून