
कन्याकुमारीमध्ये तीन दिवसांची सुट्टी साजरी करून परतलेल्या एका कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांच्या बंगळुरू येथील घरात चोरट्यांनी डल्ला मारला असून, लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि तब्बल 12 लाख रुपये रोख रक्कम पळवली आहे. या चोरीमध्ये एकूण 56 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पूर्व बंगळुरूमधील दोड्डाबनासावडी येथील लक्षम्मा लेआउटमध्ये राहणाऱ्या पी. रंगनाथ यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, हे कुटुंब 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता आपल्या पहिल्या मजल्यावरील घराला कुलूप लावून कन्याकुमारीला गेले होते.
पण, 11 नोव्हेंबरला जेव्हा ते सुट्टीवरून घरी परतले, तेव्हा घराचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि कुलूप तुटलेले होते. हे पाहून त्यांच्या आनंदावर विरजण पडले.
घरात गेल्यावर रंगनाथ यांना दिसले की बेडरूममधील कपाटाची कुलूपेही तोडलेली होती आणि अनेक मौल्यवान वस्तू गायब होत्या.
चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने पळवल्याचे समोर आले आहे. यामध्ये सोन्याची मंगळसूत्र साखळी, चार सोन्याच्या साखळ्या, एक सोन्याची अंगठी, 10 जोडी सोन्याचे कानातले, एक सोन्याचा हार, एक जोडी बांगड्या, एक ब्रेसलेट, आणखी चार सोन्याच्या अंगठ्या आणि पाच सोन्याच्या बिस्किटांचा समावेश आहे.
याशिवाय, चोरट्यांनी घरातून 12 लाख रुपये रोख, तसेच चांदीच्या पैंजणांच्या तीन जोड्या, तीन चांदीची भांडी आणि चांदीच्या दिव्यांच्या दोन जोड्याही पळवल्या. चोरीला गेलेल्या सर्व मौल्यवान वस्तूंची एकूण किंमत सुमारे 56 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
रंगनाथ यांनी पोलिसांना सांगितले की, चोरट्यांनी 8 ते 11 नोव्हेंबरच्या दरम्यान, कुटुंब घरी नसताना ही चोरी केली. त्यांनी जबरदस्तीने घरात घुसून, कुलूपे तोडली आणि कुणालाही न समजता मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला.
या तक्रारीनंतर, बनासावडी पोलिसांनी कलम 305 (घरात चोरी) आणि 331 (घरफोडी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासासाठी गुन्हेगारी तज्ज्ञांच्या एका टीमने घटनास्थळी भेट दिली आणि पुरावे गोळा केले. या तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी आजूबाजूच्या इमारतींचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहे.