
उत्तर २४ परगणाच्या अशोकनगर भागात एका दुःखद घटनेने सर्वांना हादरवून सोडलंय. इथे १२वीत शिकणाऱ्या १८ वर्षांच्या एका मुलाने आणि मुलीने आत्महत्या केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, जीत विश्वास आणि पूजा मोंडल अशी या दोघांची नावे असून ते सेंडंगा चतुर्दशपल्ली हायस्कूलमध्ये शिकत होते आणि एकाच परिसरात राहत होते.
मुलीच्या कुटुंबीयांना ती घरात बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही ठिकाणी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, विशेषतः त्यांच्यातील संबंध आणि या घटनेपूर्वी नेमकं काय घडलं यावर पोलीस तपास करत आहेत.
जीत विश्वास आणि पूजा मोंडल हे दोघेही १८ वर्षांचे होते आणि अशोकनगरमधल्या एकाच शाळेत १२वीत शिकत होते. ते एकत्र ट्यूशनला जायचे आणि अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.
त्यांच्या वर्गमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि नेहमी एकत्र दिसायचे. ते एकाच शाळेत शिकायचे, एकत्र प्रवास करायचे आणि त्यांचे मित्रही सामाईक होते.
त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. मित्र आणि वर्गमित्रांच्या मते सर्व काही सुरळीत सुरू होतं, त्यामुळे त्यांच्या जवळच्या लोकांना ही घटना पचवणं खूप कठीण जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यूच्या काही वेळ आधी जीत व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलवर पूजाशी बोलत होता. हा कॉल सुरू असतानाच मुलीने आत्महत्या केली असं सांगितलं जातंय.
पूजाच्या खोलीबाहेरून तिला अनेकदा हाका मारूनही तिने प्रतिसाद दिला नाही, तेव्हा तिच्या घरच्यांना चिंता वाटू लागली. शेवटी ते खोलीत गेले असता ती त्यांना बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर तिच्या भावाला तिच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल अजूनही सुरू असल्याचं दिसलं.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. अशोकनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह रुग्णालयात नेले.
त्यांच्यातील संबंध हा या तपासाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. काही शेजाऱ्यांच्या मते, या दोघांच्या नात्याला घरच्यांचा विरोध असावा, ज्यामुळे ते तणावात होते.
पण पूजाची आई फुल्लारेश्वरी हिने सांगितलं की, तिला आपल्या मुलीच्या आणि जीतच्या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हती. तिने असंही स्पष्ट केलं की मुलीने जोडीदार निवडला असता तर कुटुंबाने विरोध केला नसता आणि पूजाला लग्न करण्यापूर्वी आपलं शिक्षण पूर्ण करायचं होतं.
पूजाच्या मोठ्या भावालाही ही घटना अनपेक्षित वाटली. त्याने सांगितलं की ती खूप आनंदी असायची आणि नुकतंच तिने भाऊबीजेच्या तयारीतही उत्साहाने भाग घेतला होता.
दुसरीकडे, जीतच्या कुटुंबाने यावर काहीही बोलण्यास नकार दिला. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बारासात मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या मृत्यूंमागचं नेमकं कारण तपासातून लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे.