Jhansi Viral Video: झाशीत विनयभंगाच्या आरोपीच्या वडिलांना महिलांनी चपलेने बदडले, पोलिसांसमोरच राडा

vivek panmand   | CMS
Published : Oct 08, 2026, 06:32 PM IST
crime

सार

झाशीमध्ये विनयभंगाच्या आरोपीच्या वडिलांना तीन महिलांनी चपलांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, एक पोलीस कर्मचारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

झाशीमध्ये एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या वडिलांना तीन महिलांनी बेदम मारहाण केली. या महिलांनी त्यांचा पाठलाग करत लाथा-बुक्क्यांनी आणि चपलांनी त्यांना बदडले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बुधवारी समोर आला आहे.

मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. व्हायरल व्हिडिओनुसार, या महिलांनी अवघ्या २० सेकंदात त्या व्यक्तीला तब्बल १७ वेळा चपलांनी मारले. तिथे उपस्थित असलेला एक पोलीस कर्मचारी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. जेव्हा या पोलिसाने 'तुमच्यावरही केस दाखल होईल' असा इशारा दिला, तेव्हा एका महिलेने थेट उत्तर दिले, "आधीच सात केसेस आहेत, आठवी पण चालू दे."

या व्यक्तीच्या मुलाने एका मुलीचा विनयभंग करत तिच्याशी गैरवर्तन केल्याचे महिला व्हिडिओमध्ये बोलताना ऐकू येत आहेत. त्यांनी सात दिवसांपूर्वीच पोलिसांत तक्रार दिली होती. पण जेव्हा जेव्हा पोलीस आरोपीच्या घरी गेले, तेव्हा घराला कुलूप असायचे, असा दावा या महिलांनी केला आहे.

महिलांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्या आरोपीच्या घरी गेल्या, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. याचाच राग आल्याने त्यांनी वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सगळा गोंधळ सुमारे अर्धा तास सुरू होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

३७ सेकंदांच्या या क्लिपमध्ये, वाद वाढल्यानंतर महिला आरोपीच्या वडिलांशी भिडताना दिसत आहेत. पोलीस कर्मचारी त्यांना सुरक्षित बाजूला नेण्याचा प्रयत्न करतो, पण महिला त्यांचा पाठलाग करून चपलांनी मारतात. त्या व्यक्तीला खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जाते. तो उठण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा एक महिला त्याला पुन्हा खाली ढकलते. आजूबाजूचे लोक जमा झाल्यानंतर या महिला तिथून निघून जातात.

समाजसेविका श्वेता पराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी आरोपीकडे कोचिंग क्लासला जायची. एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्याने तो तिला बोलवायचा. 'आईला काही सांगू नको, नाहीतर नापास करेन' अशी धमकी तो द्यायचा. आरोपी विवाहित असून त्याला मुलेही आहेत. त्याने विद्यार्थिनीला 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' असेही सांगितले होते. घाबरलेल्या विद्यार्थिनीने घरी जाऊन आईला सगळा प्रकार सांगितला.

पराशर यांनी सांगितले की, मुलीकडून हा प्रकार समजल्यानंतर आईने आरोपीला मारहाण केली होती. त्यानंतर विद्यार्थिनीलाही बेल्ट, काठ्या आणि लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली. यानंतर त्या विद्यार्थिनीने श्वेता पराशर यांना फोन करून मदत मागितली.

पराशर यांनी विद्यार्थिनीला पोलीस ठाण्यात नेले आणि तिथे तक्रार दाखल केली. सुरुवातीला त्यांनी आरोपीला समोर बोलावण्याची मागणी केली, जेणेकरून त्याचीही बाजू ऐकता येईल. पोलिसांना आरोपीला अटक करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली होती, पण तो घरातून पळून गेला होता.

या प्रकरणात काहींनी ५० लाख रुपये घेऊन तडजोड करण्याचा सल्ला दिला होता, पण आपण त्याला कडाडून विरोध केल्याचे पराशर यांनी सांगितले. एका मुलीच्या शोषणाचे प्रकरण पैशांवर मिटवले जाऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि आरोपी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. नात्याने हा आरोपी पीडित विद्यार्थिनीचा मामा लागतो.

PREV
Crime News (गुन्हे बातम्या): Read Crime News LIVE Updates, Check पुणे क्राईम न्यूज, ठाणे क्राईम न्यूज, मुंबई क्राईम न्यूज & other trending news in Marathi at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Speeding Truck Crashes Into Dhaba: पाकिस्तानमध्ये भरधाव ट्रक थेट ढाब्यात घुसला, थरारक व्हिडिओ व्हायरल
Dehradun iPhone Theft: 'पासवर्ड दे ना', आयफोन चोरणाऱ्याने थेट मालकाच्या बहिणीलाच केला मेसेज!