
एखाद्या चित्रपटातील थरारक दृश्यासारखी एक घटना नुकतीच समोर आली आहे. एका अरुंद रस्त्यावरून चक्क आगीचा भडका उडालेला ट्रक धावत होता आणि त्याच्या अगदी वरून विजेच्या जिवंत तारा लटकत होत्या. हा अंगावर काटा आणणारा प्रकार जम्मू-काश्मीरमध्ये घडला. राजौरी शहरातील लोअर जवाहर नगर भागात सुक्या गवताने भरलेल्या एका ट्रकला अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गवतामुळे आग वेगाने पसरत होती, पण त्याहूनही भयंकर गोष्ट म्हणजे रस्त्यावर लटकणाऱ्या विजेच्या तारा. यामुळे बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
सुरुवातीला ट्रक ड्रायव्हरला मागे लागलेल्या या भयंकर आगीची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे तो तसाच ट्रक चालवत राहिला. व्हायरल क्लिपमध्ये स्पष्ट दिसतंय की, हा ट्रक थुड्डी या अत्यंत गर्दीच्या भागातून जात होता. एका क्षणी तर आगीच्या ज्वाळांनी वरच्या विजेच्या तारांनाही स्पर्श केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमधील सुक्या गवताचा वरच्या विजेच्या तारांना स्पर्श झाला आणि तिथूनच आगीला सुरुवात झाली. धोका खूप मोठा होता, पण ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत हा जळता ट्रक रहिवासी भागातून आणि घरांपासून दूर नेला. त्याच्या या धाडसामुळे एक मोठा अनर्थ टळला.
#Jammukashmir
राजौरीमध्ये जळत्या ट्रकमुळे उडाली खळबळ; मोठा अनर्थ टळला
जम्मू-काश्मीरच्या राजौरी शहरात एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. लोअर जवाहर नगरच्या थुड्डी भागात सुक्या गवताने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. धक्कादायक म्हणजे, आग लागलेली असतानाही हा ट्रक अरुंद रस्त्यांवरून धावत होता, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली.
माहितीनुसार, सुक्या गवताने भरलेला हा ट्रक थुड्डी भागातून जात असताना गवताचा वरच्या पॉवर लाईन्सला स्पर्श झाला. यामुळे ठिणग्या उडाल्या आणि गवताने पेट घेतला.
आग वेगाने भडकली आणि ट्रकमधील गवत धडधडून जळू लागले. रहिवासी भागातून हा जळता ट्रक जात असल्याने आजूबाजूच्या घरांनाही आग लागण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.
पण, ट्रक ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवत अरुंद रस्त्यांवरून ट्रक सुरक्षितपणे घरांपासून दूर नेला. त्याच्या या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
— Amit Bhardwaj (@AmmyBhardwaj) October 22, 2026
मध्य प्रदेशातही अशीच एक धक्कादायक घटना घडली. ट्रॅक्टर-ट्रॉलीवर विजेची जिवंत तार पडल्याने दोघांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. नवरात्री उत्सवानंतर दुर्गा मूर्तीच्या विसर्जनासाठी ही मूर्ती ट्रॅक्टर-ट्रॉलीवरून नेली जात होती.
मध्य प्रदेशातील जबलपूर भागात गुरुवारी, २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. या दुर्घटनेत आणखी सहा जण जखमी झाले आहेत.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पन्नासहून अधिक लोक सिव्हिल लाईन पथावरून नरिली तलावात विसर्जनासाठी मूर्तीची मिरवणूक काढत होते. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या मझौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री १२:०४ वाजता हा भयंकर अपघात झाला.