
जालना जिल्ह्यातील बदनापूर शहर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरलं आहे. भरदिवसा, शंकरनगर भागात बाप अशोक अंबिलडगे आणि त्यांचा मुलगा यश अंबिलडगे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पैशाच्या वादातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. या दुहेरी हत्येने संपूर्ण शहरात खळबळ माजली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
घटना मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक अंबिलडगे आणि त्यांचा मुलगा यश दोघंही शंकरनगर परिसरात राहत होते. त्या दिवशी दुपारी अचानक काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बाप-लेक दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण ५-६ आरोपी सामील होते, ज्यामध्ये मृत अशोक अंबिलडगे यांचा सख्खा भाऊ विष्णू अंबिलडगे याचा समावेश आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वादाचं मूळ कारण पैशाची देवाणघेवाण असल्याचं सांगितलं जातंय.
पोलीस तपासातून हे समोर आलंय की या घटनेमध्ये जालना शहरातून आलेल्या काही नातेवाईकांचाही सहभाग असू शकतो. या प्रकरणात बदनापूर पोलिस स्टेशनचे पीआय सुदामा भागवत आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असून, आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांत जालना जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच भोकरदन नाक्यावर घडलेली घटना ताजी असतानाच ही दुसरी मोठी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत अंबड तालुक्यात महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा करत असताना महसूल कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी आक्रमक पवित्रा घेतला. जीव वाचवण्यासाठी तहसीलदारांनी स्वतःजवळील पिस्तुलमधून हवेत चार राउंड गोळ्या झाडल्या. सध्या अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
एका मागोमाग एक अशा घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांनी जालना जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिस आणि प्रशासन यांच्यावर टीका होत असून, नागरिक आता अधिक सुरक्षा आणि तातडीने कारवाईची मागणी करत आहेत.