
अमळनेर (जळगाव) : एखाद्या गूढ क्राईम थ्रिलरला लाजवेल, अशी रौद्र घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये उघडकीस आली आहे. अनिल संदानशिव या नराधमाने प्रेमाच्या जाळ्यात महिलांना अडकवून, जंगलात नेऊन दगडाने ठेचून निर्घृण खून केला. त्याने दोन महिलांना अशा क्रूरपणे मारलं असून, आणखीही काही महिलांचे जीव त्याने घेतले असावेत, असा संशय पोलिसांना आहे.
याच पार्श्वभूमीवर सुमठाणे शिवारातील जंगलात पुन्हा एकदा मोठं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. पोलीस आणि वनविभागाच्या २५-३० जणांच्या चमूने संपूर्ण परिसर चाचपडून तपास सुरु केला आहे.
या भीषण घटनेत अनिल संदानशिव याने शोभाबाई कोळी आणि वैजयंताबाई भोई यांचा खून केला, तर शाहनाज बी या महिलेने प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला.
१. शोभाबाई कोळी (ता. पारोळा) २५ जून रोजी जंगलात गोणीमध्ये ठेवलेला मृतदेह सापडला. डोक्यात दगड घालून खून.
२. वैजयंताबाई भोई (मूळ गाव फरकांडे, ता. एरंडोल) प्रेमाच्या जाळ्यात ओढून सुरतहून जळगावला आणली. २ मे रोजी जंगलात नेऊन ठार मारलं. २३ जुलैला आधारकार्ड, हाडांचे अवशेष आणि चप्पल सापडली.
३. शाहनाज बी – तिचाही खून करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आरडाओरड केल्याने काही लोकांनी धाव घेतली आणि अनिल पळून गेला.
अनिल संदानशिव हा अत्यंत व्यवस्थित आणि शांत डोक्याने गुन्हे करणारा आरोपी आहे. तो विविध ठिकाणी बसमध्ये, गावात, किंवा कामाच्या ठिकाणी महिलांशी ओळख वाढवत असे. गोड गप्पा, प्रेमाचं नाटक, शरीरसंबंध हा ठरलेला पॅटर्न. एकदा महिलांचा विश्वास मिळाल्यानंतर त्यांना सुमठाणे शिवारातील जंगलात घेऊन जात असे आणि तिथे डोक्यात दगड घालून खून करत असे. त्याआधी तो त्यांच्याकडील दागिने, रोख रक्कम हिसकावून घेत असे.
अनिल संदानशिवच्या चौकशीत अजून काही महिलांच्या हत्येचे धागेदोरे मिळू शकतात, असा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे जंगल परिसरात नवीन पुरावे मिळण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. या मोहिमेत काही संशयास्पद वस्तू सापडल्या असून, त्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. पोलिसांची चौकशी सुरू असून, पुढील तपासात अनिल एकटा होता की यामागे आणखी कोणी सामील आहे, याचा शोध घेतला जात आहे.
हा सीरियल किलर सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्याविरोधात खून, लूट, फसवणूक आणि बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा गुन्ह्यांचा व्याप किती मोठा आहे आणि आणखी किती महिलांचे बळी गेले आहेत, हे तपासाअंती स्पष्ट होईल. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. ‘लेडी सीरियल किलर’ची खरी कहाणी अजूनही पूर्ण उलगडायची आहे.