मासिक पाळी ठरली मृत्यूचं कारण? जळगावात विवाहितेचा संशयास्पद अंत, सासरच्यांवर खुनाचा आरोप

Published : May 02, 2025, 10:26 AM IST
jalgaon gayatri murder

सार

जळगाव जिल्ह्यातील किनोद येथे एका २६ वर्षीय विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सुरुवातीला आत्महत्या असल्याचे बोलले जात असताना, नातेवाईकांनी सासू-नणंदेवर हत्येचा आरोप केल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

जळगाव: किनोद (ता. जळगाव) येथे एका तरुण विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 26 वर्षीय गायत्री ज्ञानेश्वर कोळी यांचा मृतदेह गुरुवारी (1 मे) गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं बोललं जात होतं, पण आता या घटनेला धक्कादायक वळण मिळालं आहे. गायत्रीच्या नातेवाईकांनी सासू आणि नणंदेवर तिचा गळा आवळून खून केल्याचा गंभीर आरोप केला आहे, ज्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात, याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

गायत्री किनोद येथे पती, सासू आणि दोन लहान मुलांसोबत राहत होती. पती भाजीपाला विकून कुटुंबाचा आधारस्तंभ होते, तर गायत्री स्वतःच्या शिवणकामातून संसाराला हातभार लावत होती. अशा परिस्थितीत, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास गायत्रीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आणि परिसरात शोककळा पसरली.

या घटनेची माहिती मिळताच गायत्रीचे कुटुंबीय तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तिथे पोहोचल्यावर त्यांना वेगळीच शंका आली. गायत्रीचा भाऊ सागर कोळी, बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी स्पष्टपणे आरोप केला की गायत्रीने आत्महत्या केलेली नाही, तर तिच्यासोबत नक्कीच काहीतरी गंभीर घडलं आहे.

सागर कोळी यांनी धक्कादायक माहिती देताना सांगितलं, "गायत्रीला मासिक पाळी आली होती आणि त्या स्थितीत तिने घरात स्वयंपाक केला होता. तिच्या सासू आणि इतरांना ते मान्य नव्हतं. याच क्षुल्लक कारणावरून घरात वाद झाला, जो नंतर खूप वाढला. या भांडणाबद्दल तिने वडिलांनाही सांगितलं होतं, पण ते बाहेरगावी होते. याच संधीचा फायदा घेऊन तिच्या सासू आणि नणंदेने घरी येऊन तिला मारहाण केली आणि तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर, त्यांनी याला आत्महत्येचा रंग देण्यासाठी तिच्या गळ्यात साडी बांधून तिला लटकवलं."

घडल्या प्रकारानंतर पतीसह सासू आणि नणंद फरार

गायत्रीने गळफास घेतल्याची बातमी मिळताच तिचे पती, सासू आणि नणंद घरातून फरार झाले. गायत्रीला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर, रुग्णालयात गायत्रीच्या माहेरच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा आरोप करत, जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. गायत्रीच्या पश्चात पती, मुलगा ध्रुव (वय 5) आणि मुलगी नियती (वय 7) असा परिवार आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत, आणि आता या प्रकरणात आणखी काय नवीन खुलासे होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

US : STI च्या वादावरुन अमेरिकन विद्यार्थ्याकडून प्रेयसीवर चाकू हल्ला, हत्येप्रकरणी ठरला दोषी
गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून