Ghaziabad Crime: गाझियाबादमध्ये जिम ट्रेनरच्या मदतीने नवऱ्याला संपवण्याचा बायकोचा प्लॅन, सीसीटीव्हीत कैद झाला थरार

vivek panmand   | CMS
Published : Oct 29, 2026, 08:15 PM IST
photo

सार

गाझियाबादमध्ये एका महिलेने आपल्या जिम ट्रेनर प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. झोपेत असलेल्या शशांकवर प्रताप सिंगने १२ वेळा चाकूने वार केले, पण शेजाऱ्यांनी त्याला पळून जाताना पकडले.

गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका धक्कादायक घटनेत, बायकोनेच जिम ट्रेनरसोबत मिळून नवऱ्याला मारण्याचा कट रचला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. २६ ऑक्टोबरच्या सकाळी वसुंधरा येथील भाड्याच्या घरात शशांक कांतेरिया याच्यावर अत्यंत क्रूरपणे चाकूने वार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी शशांकची पत्नी प्रिया शर्मा आणि तिचा जिम ट्रेनर प्रताप सिंग या दोघांना अटक केली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की, २६ ऑक्टोबरला पहाटे ५:१७ वाजता प्रिया वसुंधरा सेक्टर-१ मधील 'जागृती रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन सोसायटी'तल्या आपल्या घरातून कारने बाहेर पडते. ती गेल्यावर बरोबर तीन मिनिटांनी, म्हणजे ५:२० च्या सुमारास प्रताप सिंग पळत सोसायटीत येतो आणि थेट त्यांच्या घरात घुसतो. त्यानंतर त्याने झोपेत असलेल्या शशांकवर तब्बल १२ वेळा चाकूने सपासप वार केले.

या हल्ल्यादरम्यान शशांकचा ओरडण्याचा आणि त्यांच्या ३ वर्षांच्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. सकाळी ५:२३ च्या सुमारास प्रतापने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी सांगितलं की, त्यावेळी त्याच्या हातात दोन चाकू होते. संशय आल्याने तिथले रहिवासी, सिक्युरिटी गार्ड आणि दोन दुचाकीस्वारांनी मिळून प्रतापला सोसायटीच्या मेन गेटवरच अडवलं आणि पकडलं. त्यानंतर २० मिनिटांनी शेजाऱ्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिलं, तेव्हा शशांक रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या सोसायटीत बाहेरच्या व्यक्तीला येण्यासाठी रहिवाशांची परवानगी लागते. पण प्रियाच्या मदतीनेच प्रताप आत शिरल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. प्रतापला सहज घरात घुसता यावं, म्हणून प्रियाने घराचा दरवाजा मुद्दाम उघडाच ठेवला होता. उत्तर प्रदेशातील झाशीचा राहणारा शशांक आणि प्रिया यांचं ४ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. प्रियाचं हे दुसरं लग्न होतं आणि दोघेही सरकारी नोकरीत आहेत. गेल्या ७-८ महिन्यांपासून प्रिया 'फिटनेस हेडक्वार्टर्स' नावाच्या जिममध्ये जात होती. तिथेच तिची प्रताप सिंगशी ओळख झाली आणि ते व्हॉट्सॲपवर बोलू लागले. चौकशीत उघड झालंय की, प्रताप आणि प्रिया लग्न करण्याचा विचार करत होते.

शशांकला त्यांच्या या अफेअरबद्दल समजलं होतं. त्यामुळे दिवाळीनंतर घर बदलण्याचा त्याचा विचार होता. हे कळताच त्या दोघांनी शशांकलाच संपवण्याचा प्लॅन बनवला. २५ ऑक्टोबरला सकाळी रनिंग करताना त्यांनी या हत्येचा कट रचला. शशांकचा भाऊ रितेश कांतेरिया याने सांगितलं की, शशांकच्या डोक्यावर, मानेवर, खांद्यावर आणि छातीवर चाकूचे खोल वार झाले आहेत. छातीवर झालेल्या गंभीर वारामुळे त्याच्या फुफ्फुसांना मोठी दुखापत झाली असून, त्याला बरं व्हायला बराच वेळ लागणार आहे.

PREV
Crime News (गुन्हे बातम्या): Read Crime News LIVE Updates, Check पुणे क्राईम न्यूज, ठाणे क्राईम न्यूज, मुंबई क्राईम न्यूज & other trending news in Marathi at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

PNB Fraud Case: ना SMS आला, ना सही केली; PNB मधून ग्राहकांचे ३५ कोटी रुपये गायब
Train Luggage Theft: गर्लफ्रेंडचे शौक पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरने ट्रेनमध्ये केली चोरी, 'लकी' तारखांना करायचा हातसाफ