मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील इंद्रगढ गावात शेतात पाणी देण्याच्या वादातून एका दलित युवकाची हत्या करण्यात आली. सरपंच आणि त्याच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप असून ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
शिवपुरी(मध्यप्रदेश): शिवपुरी जिह्यातील इंद्रगढ गावात एका युवकाची क्रुरपणे हत्या करण्यात आली आहे. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी शेतात पाणी देण्याच्या वादातून झाली. असा आरोप आहे की, सरपंच पदमसिंह धाकड आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी २८ वर्षीय नारद जाटववर काठी आणि दांड्याने हल्ला केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. या घटनेमुळे मध्यप्रदेशातील राजकारण तापले आहे.
नारद जाटव ग्वाल्हेर येथील रहिवासी होता आणि आपल्या मामाच्या घरी इंद्रगढ येथे आला होता. शेताता पाणी देताना सरपंच आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य तेथे आले आणि नारदला शिव्या देऊ लागले. त्याने विरोध केल्यानंतर वाद वाढला आणि दोन्ही गटात मारहाण सुरू झाली. आरोपींनी नारदला बेदम मारहाण केली. नारदला गंभीर स्थितीत शिवपुरी मेडिकल कॉलेज येथे आणले गेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात सरपंच आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य नारदला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे घटना आणखी गंभीर बनली आहे. सुभाषपुरा पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी म्हटले आहे की याप्रकरणी लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल.
नारद आणि त्याच्या मामाच्या कुटुंबाचा सरपंच पदम धाकडच्या कुटुंबाशी रस्ता आणि बोअरवेलच्या कारणावरून जुना वाद होता. या वादावरून त्यांच्यात नेहमी खडाजंगी व्हायची. पोलिसांनी सरपंचासहित त्याच्या कुटुंबातील ८ सदस्यांना आरोपी बनवले आहे.
शिवपुरीत दलित युवकाची हत्या झाल्यानंतर काँग्रेसने सरकारवर हल्ला चढवला आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एक्सवर लिहिले आहे की, एका दलित युवकाची काठी-दांड्याने बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडामुळे दलित वर्ग मध्यप्रदेशात सुरक्षित नसल्याचे सिध्द झाले.
हेही वाचा-
संभळ संघर्ष: गाजियाबादमध्ये लीग खासांना यूपी पोलिसांनी अडवले