
पटना: बिहारमधील एका शाळेत मुख्याध्यापकाने मध्यान्ह भोजनासाठी आणलेली अंडी चोरल्याची घटना घडली आहे. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात ही घटना घडली. मध्यान्ह भोजनासाठी आणलेल्या वाहनातून ड्रायव्हरच्या मदतीने मुख्याध्यापकाने अंडी चोरली. वाहनातून अंडी काढून ती एका पिशवीत भरून मुख्याध्यापकांना दिली. १३ डिसेंबर रोजी हा वादग्रस्त प्रकार घडला. रीखर येथील माध्यमिक शाळेत ही घटना घडली. पटनापासून ४८ किमी अंतरावर ही शाळा आहे.
सुरेश साहनी नावाच्या सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवरून राज्य शिक्षण विभागाने मुख्याध्यापकाकडून स्पष्टीकरण मागितल्याचे टाइम्स ऑफ इंडियासह अनेक राष्ट्रीय वृत्तपत्रांनी वृत्त दिले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर २४ तासांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
मुख्याध्यापकांचे स्पष्टीकरण आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे वैशाली जिल्हा शिक्षणाधिकारी बिरेन्द्र नारायण यांनी राष्ट्रीय माध्यमांना सांगितले. यापूर्वीही मुख्याध्यापकांनी असेच कृत्य केल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालक करत आहेत.
मध्यान्ह भोजनाचा भाग म्हणून शुक्रवारी विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी दिली जातात. हे पोषण आहार योजनेअंतर्गत केले जाते. यापूर्वीही मेनूमध्ये नमूद केलेले सर्व पदार्थ मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. जानेवारीमध्ये निवृत्त होणार असताना मुख्याध्यापक वादात सापडले आहेत.