प्रेयकरास सात तासांची मुदत देऊनही त्याने प्रतिसाद न दिल्याने एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. नेमके काय घडले?
सध्या छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही तरुण-तरुणी आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत. विवाहित असूनही, काहीवेळा अनैतिक संबंधात अडकून काही जण मृत्यूपंथाला लागतात, तर काही जण चुकीचे पाऊल उचलून शेवटी आपले जीवन संपवतात. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात २७ वर्षीय विवाहित महिलेने प्रियकराला सात तासांची मुदत दिली आणि शेवटी प्रतिसाद न मिळाल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घरातील भांडणाला कंटाळून तिने प्रियकराची माफी मागताना एक व्हिडिओ बनवला होता. ब्युटी पार्लर चालवणारी राधा ठाकूर काही वर्षांपूर्वी पतीपासून वेगळी झाली होती आणि पालनपूरमध्ये बहिणीसोबत राहत होती. आता तिने आत्महत्या केली आहे.
याबाबत बोलताना तिची बहीण म्हणाली, 'माझी बहीण ब्युटी पार्लर चालवायची, रविवारी रात्री ती घरी परतली. जेवण केल्यानंतर आम्ही झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ती बाहेर न आल्याने आम्ही आत जाऊन पाहिले. ती मृत अवस्थेत आढळली. धक्क्याने आम्ही तिचा फोन तपासला तेव्हा आम्हाला तिने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सापडला. तो आम्ही पोलिसांना दिला आहे,' असे राधाची बहीण अलका म्हणाली. कुटुंबीयांनी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली असून, त्याची ओळख आपल्याला नाही, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी तो व्हिडिओ तपासला असता, त्यात ती प्रियकराची माफी मागत असल्याचे दिसून येते. "मला माफ करा, मी तुमच्या नकळत चुकीचे पाऊल उचलत आहे, दुःखी होऊ नका, आनंदी राहा, जीवन जगण्याचा आनंद घ्या आणि लग्न करा. मी आत्महत्येने मरण पावले असे समजू नका. मी हात जोडून माफी मागते. तुम्ही आनंदी असाल तर माझ्या आत्म्याला शांती मिळेल, मी काम आणि जीवनाबाबत असमाधानी आहे. म्हणूनच मी हे पाऊल उचलत आहे," असे ती म्हणाली.
यापूर्वी तिने प्रियकराला पाठवलेल्या मेसेजमध्ये ती त्याला काहीतरी फोटो देण्यास सांगत असल्याचे दिसून येते. तो तिचा फोटो होता की त्याचा फोटो होता हे निश्चित नाही. किंवा दोघांचाही एकत्र फोटो असू शकतो, हे तपासातूनच समजेल. सात तासांची मुदत देते. तोपर्यंत मला फोटो हवा, असे ती म्हणाली. पण त्याच्याकडून प्रतिसाद आला नाही, असे म्हटले जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ३४ वर्षीय टेक कर्मचारी अतुल सुभाष यांच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्य समस्या आणि आत्महत्येबाबत देशभर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महिलेच्या आत्महत्येमुळे मानसिक आरोग्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.