बेंगळुरुत महिलांवर अत्याचार, रात्री मैत्रिणीची वाट पाहणाऱ्या महिलेवर बलात्कार

कोरमंगलामध्ये रात्री उशिरा मैत्रिणींना भेटायला आलेल्या महिलेवर चार आरोपींनी हॉटेलमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी आरोपींना अटक करून चौकशी सुरू केली आहे.

बेंगळुरु : रात्री उशिरा मैत्रिणींना भेटायला आलेल्या महिलेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोरमंगला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

कोरमंगला येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या ३३ वर्षीय पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडमधील अजित, विश्व, शिबुल आणि शोभन या चार आरोपींना अटक करून चौकशी सुरू केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय आहे घटना?

सामूहिक बलात्काराला बळी पडलेली पीडिता दिल्लीची आहे. मात्र, शहरातील एका व्यक्तीशी लग्न करून ती गेल्या अनेक वर्षांपासून बेंगळुरुत राहत होती. लग्न समारंभांमध्ये जेवण वाढण्याचे काम ती करायची. गुरुवारी रात्री उशिरा ती कोरमंगला येथील ज्योती निवास कॉलेज जंक्शन येथे मैत्रिणींना भेटण्यासाठी वाट पाहत होती. तेव्हा चार आरोपी तिथे आले आणि तिच्याशी गोड बोलून हॉटेलमध्ये जेवायला नेले.

सामूहिक बलात्कार:

त्यानंतर चारही आरोपींनी पीडितेला लैंगिक छळ केला. त्यानंतर तिच्या विरोधाला न जुमानता तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सकाळी ६ वाजेपर्यंत तिला त्यांच्या ताब्यात ठेवून हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी देऊन सोडून दिले. त्यानंतर घरी आल्यावर पीडितेने आपल्या पतीला ही घटना सांगितली. त्यानंतर ११२ या पोलीस मदत क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना अटक केली. अटक केलेले चारही आरोपी हे परराज्यातील आहेत. ते कोरमंगला येथील एका हॉटेलमध्ये काम करत होते. आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे. याप्रकरणी कोरमंगला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.

पीडिता मैत्रिणीची वाट पाहत असताना आरोपी तिला हॉटेलच्या छतावर घेऊन गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शुक्रवारी सकाळी आम्हाला घटनेची माहिती मिळाली. तातडीने कारवाई करत चारही आरोपींना अटक करण्यात आली. पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.

- सारा फातिमा, आग्नेय विभागाचे डीसीपी

Share this article