एम्समधील डॉक्टरने ५० कोटी हुंडा मागितल्याने खळबळ

एम्समधील एका उच्चपदस्थ डॉक्टरने ५० कोटी रुपये हुंडा मागितल्याचा आरोप एका तरुणीने सोशल मीडियावर केला आहे. तिच्या मैत्रिणीसाठी हा हुंडा मागितल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

आपल्या देशात हुंडा घेणे आणि देणे कायद्याने बंदी आहे. तरीही अनेक लोक हुंडा घेतात आणि देतात. हुंड्यामुळे अनेक महिलांना आत्महत्या करावी लागते. कितीही शिक्षण घेतले तरी काही लोकांच्या विचारांत अजूनही जुनाटपणा आहे. हेच दाखवणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एम्समधील एका डॉक्टरने ५० कोटी रुपये हुंडा मागितल्याचा आरोप एका तरुणीने एक्स (ट्विटर) वर केला आहे. हैदराबादच्या तरुणीच्या कुटुंबाला एम्समध्ये काम करणाऱ्या डॉक्टरने ५० कोटी हुंडा मागितल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

एम्समध्ये पहिला क्रमांक मिळवलेल्या युवतीच्या मैत्रिणीला युवतीच्या कुटुंबियांनी ५० कोटी रुपये हुंडा मागितल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. ती युवतीही डॉक्टर आहे आणि एमडी अनस्थेशिया करत आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता नसल्यास शिक्षण, रँक आणि गुणवत्तेचा काय उपयोग, असा सवाल पोस्ट करणाऱ्या तरुणीने विचारला आहे.

ही पोस्ट लगेचच चर्चेचा विषय बनली. अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या. एका व्यक्तीने लिहिले: ‘माझा एक स्कूलचा सिनियर होता. तो गरीब आणि अनाथ होता. त्याचे सर्व खर्च आमचे प्राचार्य करायचे. आता तो हृदयरोगतज्ज्ञ आहे. लग्नाच्या वेळी त्याने कॅथलॅब असलेले ३ मजली रुग्णालय, मालमत्ता आणि २ कोटी रोख रक्कम हुंडा मागितला. त्याला लवकरच हुंडा देणारी मुलगी मिळाली हे विशेष.’ अशाच प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. भारतात हुंडाबंदी कायदा अजूनही प्रभावीपणे लागू झालेला नाही हेच यावरून दिसून येते.

Share this article