
Pune: पुणे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. किरकोळ कारणावरून वादविवादाचे प्रमाण वाढलं असून त्यामुळे हत्या करण्यापर्यंत प्रकरण वाढतच चालले आहेत. एका पानटपरीवर झालेल्या वादाचे रूपांतर हत्येत झालं असून त्यामुळं शहरातील वातावरण ढवळून निघालं आहे. कात्रजच्या साई सिद्धी चौकात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आर्यन साळवे (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील होता. सध्या तो आंबेगाव पठार, धनकवडी येथे मामांकडे राहत होता. काही दिवसांपूर्वी तो पुण्यात मामाकडे आला होता. तो या ठिकाणी एका केशकर्तनालयात काम करत होता. अटक केलेल्या आरोपीचे नाव धैर्यशील मोरे (वय 30) आहे. तो साई सिद्धी चौकातच राहतो.
११ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आर्यन पान टपरीवर पान खाण्यासाठी गेला होता. तिथे धैर्यशील सिगारेट ओढत उभा होता. धैर्यशीलने आर्यनकडे ‘खोडसाळ नजरेने’ पाहिल्याचा आरोप करत दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात धैर्यशीलने कोयत्याने आर्यनवर वार केले. आर्यनने हात पुढे करून बचाव करण्याचा प्रयत्न केला. यात त्याची बोटे तुटली. डोक्यावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
पोलीस निरीक्षक राहुलकमर खिलारे यांनी माहिती दिली आहे. "हा खून अचानक झालेल्या किरकोळ वादातून झाला आहे. यामागे काही पूर्ववैमनस्य होतं का, याचा तपास सुरू आहे." अशी माहिती दिली आहे. यावेळी भारती पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.