७१ वर्षीय पतीने पत्नी आणि कुत्र्यांची हत्या केली

ओरेगॉनमध्ये ६१ वर्षीय महिलेचा आणि तिच्या दोन पाळीव कुत्र्यांचा मृतदेह सापडला. महिलेचे पती मायकेल फोर्नियर (७१) यांना दुहेरी हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दोघांमध्ये वाद सुरू होते आणि ते वेगळे राहत होते.

ओरेगॉन: ६१ वर्षीय पत्नी आणि दोन पाळीव कुत्र्यांची हत्या केल्याप्रकरणी ७१ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये २२ नोव्हेंबर रोजी ६१ वर्षीय महिलेचा मृतदेह पोर्टलँडजवळ गाडलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेहाजवळच तिच्या दोन पाळीव कुत्र्यांचेही मृतदेह सापडले.

सुसान लेन फोर्नियर (६१) ही २२ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली होती. ती कामावर न आल्याने पोलिसांनी तिचे शोधकार्य सुरू केले होते. सुसानचे पती मायकेल फोर्नियर (७१) यांना दुहेरी हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते आणि ते वेगळे राहत होते.

६१ वर्षीय महिलेच्या बेपत्ता प्रकरणी पोलिसांनी लोकांकडून मदत मागितली होती. महिलेचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु पोलिसांनी हा खून असल्याचे म्हटले आहे. तिची कार सोडलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली होती. सुसानच्या मैत्रिणीने सोडलेल्या कारपासून जवळच तिचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली. तिचे हातपाय बांधलेले होते. शनिवारी तिच्या मृतदेहाजवळच तिच्या पाळीव कुत्र्यांचेही मृतदेह सापडले.

Share this article