
तुम्ही मारुती सुझुकीची ग्रँड विटारा ही गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर हा महिना तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. कारण SUV गाड्यांच्या बाजारात सध्या मोठी स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक कंपनी नवनवीन SUV गाड्या लाँच करत आहे. क्रेटा, डस्टरसारख्या गाड्यांच्या सेगमेंटमध्ये आता निसानने Tecton ही नवी गाडी आणली आहे. यानंतर लगेचच मारुती सुझुकीने आपल्या ग्रँड विटारा SUV वर जबरदस्त डिस्काउंट जाहीर केला आहे. त्यामुळे आता मारुतीची ही गाडी आणखी स्वस्त झाली आहे.
मारुती सुझुकीने ग्रँड विटारावर जुलै महिन्यासाठी डिस्काउंट जाहीर केला आहे. ही ऑफर ३१ जुलैपर्यंत लागू असेल. या महिन्यात ग्रँड विटारा बुक करणाऱ्या ग्राहकांना या डिस्काउंट ऑफरचा फायदा मिळेल. हा डिस्काउंट गाडीच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार कमी-जास्त असेल. ग्रँड विटाराच्या सिग्मा व्हेरिएंटवर एकूण ९५,००० रुपयांची सूट मिळत आहे. तर, ग्रँड विटाराच्या डेल्टा पेट्रोल व्हेरिएंटवर एकूण ८५,००० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. याचबरोबर, झेटा आणि अल्फा व्हेरिएंटच्या ऑफर्समध्ये बदल असू शकतो. मारुतीने जाहीर केलेल्या या डिस्काउंटमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, लॉयल्टी रिवॉर्ड आणि कॉर्पोरेट बोनस अशा अनेक ऑफर्सचा समावेश आहे.
मारुती सुझुकीने ग्रँड विटाराच्या CNG व्हेरिएंटवरही चांगली ऑफर दिली आहे. डेल्टा CNG आणि झेटा CNG या गाड्यांवर एकूण ९०,००० रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर मिळत आहे. सध्याच्या काळात CNG गाड्यांची मागणी खूप वाढत आहे.
मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये ग्राहक आता हायब्रीड मॉडेलला पसंती देत आहेत. जास्त मायलेज आणि कमी मेंटेनन्स खर्चामुळे लोक स्ट्रॉंग हायब्रीड मॉडेल निवडत आहेत. आता मारुतीने ग्रँड विटारा हायब्रीड गाड्यांवरही काही खास ऑफर्स दिल्या आहेत. यामध्ये शून्य रोड टॅक्स, ५ वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी, ५०,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, ३०,००० रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि १०,००० रुपयांचा कॉर्पोरेट बोनस यांचा समावेश आहे.
सध्या बाजारात नव्या कोऱ्या ग्रँड विटाराची किंमत १०.७६ लाख रुपयांपासून ते १९.७२ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे. आता या डिस्काउंटनंतर ही किंमत आणखी कमी होईल. त्यामुळे जुलै महिन्यात मारुती विटारा खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते. स्पर्धक गाड्यांच्या तुलनेत ग्रँड विटारा कमी किमतीत उपलब्ध होत आहे, शिवाय तिचा मेंटेनन्स खर्चही इतर गाड्यांपेक्षा कमी आहे.
विशेष सूचना: गाड्यांवरील डिस्काउंट ऑफर्स राज्य आणि शहरानुसार बदलू शकतात. त्यामुळे, तुमच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधून ऑफर्सबद्दल नक्की माहिती घ्या.