
नवी दिल्ली: कोविड महामारी व्यवस्थापनातील अपयशामुळे कोविडनंतरच्या काळात भारतासह जगातील बहुतांश देशांमधील सत्ताधारी सरकारे सत्तेवरून दूर झाली, असा दावा फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग यांनी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
हे विधान वास्तवाच्या विरुद्ध असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या अनेक मंत्र्यांनी जुकरबर्ग यांच्यावर टीका केली आहे. दुसरीकडे, या विधानासंदर्भात फेसबुकची मूळ कंपनी मेटा ला नोटीस बजावण्याचा निर्णय माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीने घेतला आहे.
नेमका वाद काय आहे?: अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बोलताना जुकरबर्ग म्हणाले की, कोविड व्यवस्थापनाच्या बाबतीत जगातील बहुतांश देशांनी आपल्या नागरिकांचा विश्वास गमावला. महामारीविषयीच्या सरकारच्या धोरणांमध्ये आणि परिस्थिती हाताळण्यात ते अपयशी ठरले. त्याचा परिणाम म्हणून, त्यानंतरच्या वर्षांत झालेल्या निवडणुकींमध्ये भारतासह बहुतांश देशांमधील सत्ताधारी सरकारे सत्तेवरून पायउतार झाली.
मात्र, कोविडनंतर २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला होता. त्यामुळे जुकरबर्ग यांच्या विधानावर अनेक भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे, माहिती आणि माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीचे प्रमुख निशिकांत दुबे यांनी या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, लोकशाही देशाबद्दल चुकीची माहिती देणे हे देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवते. याबाबत मेटाने माफी मागावी. भारताच्या निवडणुकीबाबत चुकीची माहिती पसरवल्याबद्दल फेसबुकची मूळ कंपनी मेटा ला नोटीस बजावण्यात येईल.