
YouTuber Kushal Mehra Warns Indian Parents About Canada Risks : इंडो-कॅनेडियन युट्यूबर कुशल मेहरा यांनी भारतीय पालकांना आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कॅनडाला पाठवू नये, असे आवाहन केले आहे. पीआर (कायमस्वरूपी रहिवास) मिळवण्याच्या आशेने भारतातील तरुण कॅनडाला येतात. पण, तिथे शोषण, नोकरीच्या कमी संधी, वंशभेद आणि मानवी तस्करीलाही सामोरे जावे लागू शकते, असे कुशल मेहरा म्हणतात. पत्रकार रवींद्र सिंग रॉबिन यांच्याशी बोलताना मेहरा यांनी ही माहिती दिली.
कॅनेडियन महाविद्यालये आणि विद्यापीठे खोटी आश्वासने आणि बनावट डिप्लोमा विकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. '२०१९ पर्यंत, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक कॅनेडियन महाविद्यालये आणि विद्यापीठे भारतात आली. कॅनडामध्ये शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना पीआर मिळेल, असे त्यांनी सांगितले होते. यातील अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे म्हणजे 'डिप्लोमा मिल्स' आहेत, जी नोकरीच्या बाजारात फारसे महत्त्व नसलेले डिप्लोमा विकतात, हे अनेक विद्यार्थ्यांना समजलेले नाही,' असे कुशल मेहरा सांगतात.
'अनेक भारतीय विद्यार्थी नागरिकत्व मिळवण्याच्या अशा बनावट महाविद्यालयांच्या आश्वासनांना बळी पडत आहेत. वॉटर्लू, यॉर्क, वेस्टर्न यांसारख्या नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळाल्यास गोष्ट वेगळी आहे. पण इतर अनेक ऑफर्स तुमच्या भविष्याला उद्ध्वस्त करणारा एक सापळा आहेत,' असे मत कुशल मेहरा यांनी व्यक्त केले.
कॅनडामध्ये आज बेरोजगारी, जास्त भाडे आणि वाढता द्वेष यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे कुशल मेहरा सांगतात. मुलींवर लैंगिक अत्याचार होत असून, गेल्या तीन वर्षांत मानवी तस्करीला बळी पडलेल्या १३ मुलींना त्यांनी स्वतःच्या खर्चाने भारतात परत पाठवल्याचा दावाही कुशल मेहरा यांनी केला आहे.
लैंगिक व्यापाराला बळी पडणाऱ्या अनेक भारतीय महिला आहेत. अनेकजण आपली अर्धी जमीन विकून ४०-५० लाख रुपये देऊन कॅनडाला येतात. परत गेल्यास त्यांच्याकडे काय उरेल, असा सवाल कुशल मेहरा विचारतात. मेहरा यांच्या व्हिडिओवर अनेकांनी समर्थन आणि टीका करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. या सर्व गोष्टींसाठी तुमच्याकडे अचूक आकडेवारी आहे का, ही माहिती कुठून मिळाली, असा प्रश्न टीकाकारांनी विचारला. अचूक माहितीशिवाय असे आकडे सांगू नयेत, अशी टीकाही लोकांनी केली.