
US Israel Joint Strike Kills Iran Supreme Leader Khamenei : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांची हत्या एकामागोमाग एक ३० बॉम्ब टाकून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खमेनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एकत्र संपवण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहून इस्रायल आणि अमेरिकेने हा संयुक्त हल्ला केला. खमेनी नेमके कुठे आहेत, यावर इंटेलिजन्स आणि ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे अनेक दिवसांपासून नजर ठेवली जात होती. अखेर ते त्यांच्या ऑफिसमध्ये असल्याची खात्री झाल्यावरच हल्ला करण्यात आला. हा हल्ला इतका अचूक होता की खमेनी किंवा त्यांच्यासोबत मारल्या गेलेल्या इतर नेत्यांना काहीही करण्याची संधीच मिळाली नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. खमेनी यांचं संपूर्ण कंपाऊंड उद्ध्वस्त झाल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं आहे.
या हल्ल्यात खमेनी यांची मुलगी, नात, जावई आणि सून यांचाही मृत्यू झाल्याचं इराणच्या माध्यमांनी म्हटलं आहे. हल्ला सुरू झाल्यापासून खमेनी यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती. शनिवारी झालेल्या पहिल्या हल्ल्यातच त्यांची सुरक्षित इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं सॅटेलाइट फोटोंमध्ये दिसलं. त्यांचा मृतदेह सापडल्याची माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. इतकंच नाही, तर नेतन्याहू यांनी खमेनींच्या मृतदेहाचा फोटोही प्रसिद्ध केल्याचं इस्रायली माध्यमांनी म्हटलं आहे.
इस्रायली माध्यम 'चॅनल १२' च्या रिपोर्टनुसार, खमेनी एका भूमिगत बंकरमध्ये (underground chamber) होते. पण इंटेलिजन्स विभागाने त्यांचं हे गुप्त ठिकाण शोधून काढलं. हल्ल्याच्या वेळी खमेनी आपलं काम करत होते. हल्ला सुरू होण्यापूर्वीच त्यांनी त्यांचे सहकारी अली शमखानी आणि सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलचे सचिव अली लारीजानी यांची भेट घेतली होती, असंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात शमखानी यांचाही मृत्यू झाला.
इराणमधील वरिष्ठ राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या तीन बैठका एकाच वेळी सुरू असल्याची माहिती अमेरिका आणि इस्रायलला मिळाली होती. त्यामुळेच त्यांनी दिवसाढवळ्या हल्ला करण्याचा निर्णय घेतला, असं अमेरिकन माध्यमांनी म्हटलं आहे. हल्ल्याच्या पहिल्या काही मिनिटांतच खमेनी यांच्या निवासस्थानावर ३० बॉम्ब टाकण्यात आले. आतापर्यंत इराणचे ४० वरिष्ठ अधिकारी मारले गेले आहेत. या हल्ल्यात संपूर्ण कॉम्प्लेक्स उद्ध्वस्त झालं. यात खमेनी यांची मुलगी, नात, जावई आणि सून यांचाही समावेश आहे.
खमेनी इस्रायली हल्ल्यात मारले गेले असले तरी, हा हल्ला घडवून आणण्यात अमेरिकेची मोठी भूमिका होती, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेच्या इंटेलिजन्स आणि अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टीमपासून खमेनी वाचू शकले नाहीत, असंही ट्रम्प म्हणाले. हल्ल्यानंतर तेहरानमधील खमेनी यांच्या निवासस्थानाचे सॅटेलाइट फोटोही समोर आले आहेत.
अयातुल्ला अली खमेनी शनिवारी सकाळीच मारले गेल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. त्यांना त्यांच्याच ऑफिसमध्ये ठार करण्यात आलं. इराणविरोधातील लष्करी कारवाई सुरूच राहणार असल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने जाहीर केलं आहे. ही कारवाई अचूक आणि वेगवान असून या आठवडाभर सुरू राहील, असंही सांगण्यात आलं आहे. जोपर्यंत मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत ही कारवाई थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे, या हल्ल्याला 'अभूतपूर्व' प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचा इशारा IRGC (इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) ने दिला आहे.