US Iran Conflict : अमेरिकेची इराणला घेरण्याची तयारी, मध्य पूर्वेत लष्करी हालचालींना वेग!

Published : Feb 22, 2026, 11:47 AM IST
US Iran Conflict

सार

US Iran Conflict : इराणसोबत थेट संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन अमेरिका मध्य पूर्वेतील आपल्या लष्करी तळांमध्ये मोठे बदल करत आहे. कतारमधील अल उदेद तळावरून सैनिक हलवले जात असून, अधिक संरक्षण प्रणाली तैनात केली जात आहे.

US Iran Conflict : अमेरिका इराणसोबत थेट लष्करी संघर्षाच्या तयारीला लागली आहे. यासाठी मध्य पूर्वेतील आपल्या लष्करी तळांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू केले आहेत. 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कतारमधील अल उदेद तळावरून शेकडो सैनिकांना गुप्त मोहिमांसाठी दुसरीकडे हलवण्यात आलं आहे. कतारशिवाय बहरीन (जिथे नौदलाच्या पाचव्या आरमाराचं मुख्यालय आहे), इराक, सीरिया, कुवेत, सौदी अरेबिया आणि जॉर्डन येथील अमेरिकन तळांवरही मोठ्या हालचाली सुरू आहेत.

सध्या मध्य पूर्वेत अमेरिकेचे ३०,००० ते ४०,००० सैनिक तैनात आहेत. पण इराणने प्रत्युत्तर दिल्यास त्यांच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी पुरेशी हवाई संरक्षण यंत्रणा नाही, असं अमेरिकेला वाटतंय. त्यामुळे या भागात आणखी संरक्षण प्रणाली पाठवली जात आहे. इराणच्या मिसाइल हल्ल्यांपासून वाचण्यासाठी अमेरिकेने आपली दोन विमानवाहू जहाजे इराणच्या सीमेपासून सुरक्षित अंतरावर हलवली आहेत.

रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेच्या निशाण्यावर इराणची कमी आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रं, क्षेपणास्त्र साठवण्याची ठिकाणं, अणुप्रकल्प आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचं मुख्यालय आहे. अमेरिकेने हल्ला केल्यास, या भागातील सर्व अमेरिकन तळ आणि सुविधा आमच्या निशाण्यावर असतील, असा इशारा इराणने संयुक्त राष्ट्रातील आपल्या मिशनमार्फत दिला आहे. तसेच, जून २०२५ मध्ये जसा पूर्वनियोजित हल्ला झाला होता, तसा हा हल्ला नसेल, असंही इराणने स्पष्ट केलं आहे.

इराणमध्ये सत्तापालट घडवण्याचा उद्देश?

एकीकडे ट्रम्प प्रशासन राजनैतिक चर्चा सुरू असल्याचं अधिकृतपणे सांगत आहे, तर दुसरीकडे ट्रम्प इराणमध्ये सत्तापालट घडवण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा आहेत. तेहरानने सध्या दिलेले प्रस्ताव ट्रम्प यांना लष्करी कारवाईपासून रोखण्यासाठी पुरेसे नाहीत, असे संकेत मिळत आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मॉस्कोवर एकाच वेळी युक्रेनच्या 11 ड्रोन्सचा हल्ला, चारही आंतरराष्ट्रीय विमानतळ काही तास बंद!
US Assassination Plot : खामेनी आणि त्यांच्या मुलाच्या हत्येचा ट्रम्प यांचा 'सिक्रेट प्लॅन'? इराणवर हल्ल्याचीही तयारी!