
Trump Launches Major Trade Probe Against India : अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे जादा कर लावण्याच्या योजनेला धक्का बसल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारत आणि चीनसह १६ प्रमुख देशांविरोधात व्यापारी चौकशीचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने अमेरिकेचे अनेक जागतिक करविषयक नियम रद्द केले होते. या निर्णयाला बगल देऊन भारत आणि इतर देशांवर पुन्हा एकदा जादा कर लावण्यासाठी ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे. १९७४ च्या व्यापार कायद्यातील 'सेक्शन ३०१' या कलमाचा वापर करून ही चौकशी केली जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी (US Trade Representative) जॅमिसन ग्रीर यांनी केली.
या चौकशीचा मुख्य रोख परदेशी देशांची अतिरिक्त उत्पादन क्षमता आणि त्याचा जागतिक बाजारपेठेवर होणारा परिणाम यावर आहे. अनेक देश त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तू तयार करतात आणि त्या कमी किमतीत अमेरिकेत विकतात. यामुळे अमेरिकेतील स्थानिक उद्योगधंदे अडचणीत येत असल्याचा ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे. मोठा व्यापारी नफा, कमी मजुरी आणि सरकारी सबसिडी यांसारख्या गोष्टी वापरून हे देश व्यापार करतात का, हे अमेरिका या चौकशीतून तपासणार आहे.
या चौकशीच्या फेऱ्यात भारत आणि चीनसोबत युरोपियन युनियन, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, व्हिएतनाम आणि तैवान यांसारख्या १६ देशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कॅनडाला या चौकशीतून वगळण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी सध्या १५० दिवसांसाठी तात्पुरता १०% जादा कर लावला आहे. ही मुदत जुलैमध्ये संपण्यापूर्वी चौकशी पूर्ण करून 'सेक्शन ३०१' अंतर्गत कायमस्वरूपी जास्त आयात कर लावण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.
याशिवाय, जबरदस्तीने मजुरी करून तयार केलेल्या वस्तूंबाबतही अमेरिका लवकरच दुसरी चौकशी सुरू करणार आहे. याचा फटका जवळपास ६० देशांना बसू शकतो. मानवाधिकारांचे उल्लंघन करून उत्पादन करणाऱ्या देशांमधून होणारी आयात पूर्णपणे थांबवण्याचा ट्रम्प प्रशासनाचा विचार आहे. याआधी भारतासोबत झालेल्या चर्चेत काही सवलती मिळाल्या होत्या, पण या नव्या चौकशीमुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधात पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.