
नवी दिल्ली: हैदराबादहून थायलंडला १३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानासोबत एक मोठी दुर्घटना होता होता टळली. थायलंडमधील फुकेत विमानतळावर लँडिंग करताना विमानाचं पुढचं चाक (Nose Wheel) निखळून पडलं. या घटनेमुळे विमानतळावरील धावपट्टी (Runway) काही तासांसाठी बंद ठेवावी लागली.
एअर इंडिया एक्स्प्रेसने या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितलं की, बोईंग ७३७ विमान बुधवारी सकाळी ६.२३ वाजता हैदराबादहून निघालं होतं. थायलंडच्या फुकेत विमानतळावर सकाळी ११.२५ वाजता उतरत असताना ही घटना घडली. यामुळे विमानाचं लँडिंग गिअर खराब झालं. दुरुस्तीसाठी धावपट्टी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
मुंबई: मंगळवारी थोडी सुधारणा झाल्यानंतर बुधवारी शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १३४२ अंकांनी घसरून ७६,८६३.७१ वर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३९४.७५ अंकांनी खाली येत २३,८६६.८५ वर स्थिरावला. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना एकाच दिवसात तब्बल ५.१४ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. डॉलरच्या तुलनेत रुपया १९ पैशांनी घसरून ९२.०४ वर बंद झाला. मध्य-पूर्वेतील तणाव आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ बाहेरच्या दिशेने वळल्यामुळे ही घसरण झाल्याचं विश्लेषण केलं जात आहे.
वेलिंग्टन: ऑस्ट्रेलियाने इराणच्या आणखी दोन महिला फुटबॉलपटूंना आश्रय दिला आहे. याआधी मंगळवारी संघातील पाच सदस्यांना मानवी भूमिकेतून आश्रय देण्यात आला होता.
ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री टोनी बर्क यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 'मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथील हॉटेलमधून पाच खेळाडूंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. आता त्यांच्यासोबत आणखी दोघी जणी सामील झाल्या आहेत. यात एक खेळाडू आणि एक स्टाफ सदस्य आहे.'
केरळ: मोदींच्या आधीच CPM ने केलं हायवेचं उद्घाटन!
कोची: केरळमध्ये एक विचित्र राजकीय प्रसंग घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-६६ च्या एका भागाचं, सत्ताधारी CPM पक्षाने काही वेळ आधीच उद्घाटन केलं. उद्घाटन पत्रिकेतून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पी. ए. मोहम्मद रियास यांचं नाव वगळल्यामुळे नाराज होऊन CPM ने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
पंतप्रधान मोदी दुपारी १२.३० वाजता या मार्गाचं उद्घाटन करणार होते. मंत्र्यांचं नाव वगळल्यामुळे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही कार्यक्रमाला जाणं टाळलं. मोदींच्या आधीच CPI आमदार सी. एच. कुन्हींबू यांनी या मार्गाला हिरवा झेंडा दाखवला.
यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर म्हणाले, 'आम्ही प्रोटोकॉलनुसारच सगळ्यांना बोलावलं होतं. त्यांना वाईट वाटलं असेल, तर ती त्यांची समस्या आहे.'
'कायद्याच्या पुस्तकांची तपासणीसाठी समिती नेमा', सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
नवी दिल्ली: NCERT च्या पुस्तकांमध्ये न्यायव्यवस्थेचा अपमान करणारे धडे असल्याच्या वादावर सुप्रीम कोर्टाने केंद्राला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने या पुस्तकांची तपासणी करण्यासाठी आठवड्याभरात तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यास सांगितलं आहे.
NCERT च्या आठवीच्या समाज विज्ञान पुस्तकात 'न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार' या उल्लेखावरून सुप्रीम कोर्टाने स्वतःहून (suo motu) दखल घेतली होती. बुधवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने म्हटलं की, 'कायद्याच्या अभ्यासाशी संबंधित अभ्यासक्रमाची तपासणी करून तो अंतिम करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी. त्यात माजी न्यायाधीश, शिक्षणतज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांचा समावेश असावा.' इतकंच नाही, तर 'फक्त आठवीचं नाही, तर सर्वच इयत्तांच्या पुस्तकांची तपासणी झाली पाहिजे,' असंही कोर्टाने स्पष्ट केलं.
पुस्तकात न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्याबद्दल NCERT ने मंगळवारीच जाहीर माफी मागितली होती आणि पुस्तक मागे घेणार असल्याचं सांगितलं होतं.