२३ वर्षीय तरुणीचा शेंगदाण्यांच्या अ‍ॅलर्जीमुळे मृत्यू

हॉटेल कर्मचाऱ्यांनी जागरूक राहिले पाहिजे आणि पुन्हा कोणालाही ही परिस्थिती येऊ नये असे विद्यार्थिनीच्या पालकांनी म्हटले आहे. 

टेक्सास: रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर २३ वर्षीय तरुणीचा शेंगदाण्यांच्या अ‍ॅलर्जीमुळे मृत्यू झाला. टेक्सास कॉलेजची विद्यार्थिनी अ‍ॅलिसन पिकरिंग हिचा मृत्यू झाला. जेवणात शेंगदाणे असल्याचे तिला माहीत नव्हते, असे अ‍ॅलिसनच्या पालकांनी सांगितले. 

शेंगदाण्यांच्या अ‍ॅलर्जीबद्दल आधीच माहिती असल्याने, अ‍ॅलिसनने अनेक वेळा गेलेल्या हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणेच जेवण ऑर्डर केले. पण यावेळी जेवणाच्या रेसिपीमध्ये बदल झाला होता. त्यात शेंगदाण्याची चटणीही समाविष्ट करण्यात आली होती. हे न कळता जेवण केल्याने मुलीचा मृत्यू झाला, असे वडील ग्रोव्हर पिकरिंग यांनी सांगितले. 

अन्नपदार्थांच्या अ‍ॅलर्जी असलेल्यांनी ती पदार्थ असलेले अन्न खाल्ल्यास जीवितहानी होऊ शकते, त्यामुळे रेस्टॉरंट्स आणि ग्राहकांमध्ये स्पष्ट संवाद असणे खूप महत्त्वाचे आहे, असे अ‍ॅलिसनच्या पालकांचे म्हणणे आहे. अ‍ॅलिसनच्या शेंगदाण्यांच्या अ‍ॅलर्जीबद्दल हॉटेल कर्मचाऱ्यांना आधीच सांगितले होते, असेही पालकांनी सांगितले. नेहमीच्या जेवणात शेंगदाणे घातले असता हॉटेल कर्मचाऱ्यांनी ते सांगायला हवे होते. मेनूमध्ये शेंगदाण्यांच्या चटणीचा उल्लेख नव्हता, असे ग्रोव्हर पिकरिंग म्हणाले. 

थोडेसे जेवल्यानंतरच काहीतरी बिघडले आहे हे अ‍ॅलिसनला जाणवले. लगेचच रुग्णवाहिका बोलावून तिला रुग्णालयात नेण्यात आले. अ‍ॅनाफिलेक्सिस म्हणजेच अ‍ॅलर्जी निर्माण करणाऱ्या पदार्थांवर शरीराची प्रतिक्रियामुळे अ‍ॅलिसनचा जीव धोक्यात आला. प्रत्येकासाठी ही प्रतिक्रिया वेगवेगळी असते. काहींना बेशुद्धी येते तर काहींना श्वास घ्यायला त्रास होतो. काहीवेळा महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा थांबू शकतो.

हा एक दुर्घटनात्मक मृत्यू आहे आणि मुलीची अवस्था पुन्हा कोणालाही येऊ नये, अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली. सामान्यतः सर्वजण खातात असे निरुपद्रवी अन्न देखील काहींना अ‍ॅलर्जी निर्माण करू शकते. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी जेवणात वापरलेल्या अन्नपदार्थांबद्दल ग्राहकांना स्पष्टपणे सांगावे, अशी मागणी पालकांनी केली. 

Share this article