माद्रिद: पूरग्रस्त भागांना भेट देणाऱ्या स्पेनच्या राजा, राणी आणि पंतप्रधानांवर संतप्त जमावाने चिखलफेक केली. “तुम्ही खुन्या आहात” अशी घोषणा देत जमावाने चिखलफेक केली. स्पेनमध्ये गेल्या पाच दशकांमधील सर्वात भीषण पुरात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
स्पेनचे राजा फिलिप, राणी लेटिझिया आणि पंतप्रधान पेड्रो सान्चेझ यांच्यावर जनक्षोभ उसळला. पूरबाबत योग्य वेळी इशारा न दिल्याबद्दल आणि दुर्घटनेनंतर मदत यंत्रणा उशिरा पोहोचल्याबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला.
“आमची मदत करा. अजूनही अनेक जण आपल्या प्रियजनांना शोधत आहेत. वेळेवर इशारा मिळाला असता तर ते सर्व वाचले असते,” असे वॅलेन्सिया भागातील रहिवाशांनी सांगितले. राजा आणि राणीच्या चेहऱ्यावर आणि रेनकोटवर चिखल साचला. दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका अंगरक्षकास दुखापत झाली. पायपोर्टला भेट देत असताना राजाने रडणाऱ्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. राणीचेही डोळे पाणावले.
स्पेनमध्ये एकाच दिवसात एका वर्षाच्या पावसाएवढा पाऊस पडला. स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. मात्र, उपलब्ध माहितीच्या आधारे शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने काम केल्याचे वॅलेन्सिया प्रशासनाने म्हटले आहे. अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. अनेक घरांमध्ये अजूनही वीज नाही. लोकांचा राग समजतो आणि तो स्वीकारणे ही आपली राजकीय आणि नैतिक जबाबदारी असल्याचे स्थानिक नेते कार्लोस मॅसन यांनी म्हटले आहे.
घरे आणि रस्ते पाण्याखाली गेल्यानंतर प्रशासनाने इशारा दिला होता, अशी तक्रार आहे. पुराबाबत माहिती नसल्याने रस्त्यावर वाहनात अडकलेल्या लोकांचाच बहुतांश मृत्यू झाल्याचे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे. पाण्यात वाहून जाणारी अनेक वाहनांचे दृश्य समोर आले आहेत. स्पेनच्या आग्नेय भागात पूरस्थिती गंभीर आहे. भूमध्य सागरी किनाऱ्यावरील वॅलेन्सिया भागात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.